सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: गुरूवार, 13 मे 2021 (10:32 IST)

मराठा आरक्षणप्रश्नी लवकरच पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार – उद्धव ठाकरे

मराठा आरक्षण देण्यासंदर्भात राष्ट्रपती व केंद्र शासनाने पावले उचलावीत, यासाठी राष्ट्रपती महोदय व केंद्र शासनाला लिहिलेले पत्र देण्यासाठी शिष्टमंडळासह आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. आमच्या भावना केंद्रापर्यंत पोचविण्याची विनंती यावेळी त्यांना केली आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच पंतप्रधान यांची भेट घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे दिली.
 
राज्य शासनाच्या शिष्टमंडळासमवेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. यावेळी शिष्टमंडळाने राज्यपालांना मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने पाऊले उचलण्याबाबत राष्ट्रपती व केंद्र शासनाला विनंती करणारे पत्र राज्यपाल महोदयांना दिले.
 
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना सांगितले होते की, आरक्षण देण्याचा अधिकार राष्ट्रपती व केंद्र शासनाचा आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाने यात लक्ष घालून लवकरात लवकर पाऊले उचलावीत, अशी विनंती करणारे पत्र मा. राष्ट्रपती महोदय व केंद्र शासनाला लिहिले आहे. आपल्यामार्फत हे पत्र राष्ट्रपती व केंद्र शासनाकडे पाठवावे, अशी विनंती राज्यपाल कोश्यारी यांना केली आहे.