शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By वेबदुनिया|

केसं गळतीवर पथ्य-पाणी!

केसांचं गळणं सुरू झाल्यावर केवळ तेल लावून उपयोग होत नाही. उलट बरेचदा तेल लावल्यावर केस अधिक गळतात. कारण केसांची मूळं खूप नाजूक झालेली असतात. यासाठी पोटातून औषधं घेतल्यास व आहारात बदल केल्यास चांगला फायदा दिसून येतो. केस इतक्या प्रमाणात गळत असल्यास तेल खूप लावू नका. तसेच तेल लावताना कापसानं केसांच्या मुळाजवळ कोमट तेल सोडावं. डोक्याला मसाज अजिबात करू नये. आहारात मात्र पुढील बदल अवश्य करावा. 

रोज राजगिरा लाडू अथवा राजगिरा लाह्या खाव्या. सोबत दूध किंवा ताक घ्यावं. अन्यथा गव्हासह राजगिरा दळून आणावा. याचं प्रमाण पाच किलो गव्हास एक किलो राजगिरा घेऊन गहू दळून आणावेत.

पेरू, अंजिर ही फळं नियमित खावी.

दुधात जेष्ठमध टाकून ते उकळून प्यावं. हे प्रमाण एक कप दुधात अर्धा चमचा जेष्ठमध पावडर इतकं असावं. हा नियम रोज करावा.

सकाळी अनशापोटी अर्धा चमचा कच्चे अहळीव खावे.

तुपात भिजलेला डिंक १/४ चमचा दुधातून घ्यावा.

ओलं खोबरं खावं. साधारणत: एक नारळ पाच दिवसात संपवावा.

केस गळती कमी होईपर्यंत केसांना खूप जपून हाताळावं. केसांना तेल लावणं, मसाज करणं, वाफ लावणं, ‘हेअर पॅक’ लावणं टाळावं. केस गळतीसाठी बाजारात उपलब्ब्ध असलेलं कोणतंही औषध आपल्या मनानं घेऊ नये आणि घ्यायची झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानं आणि ते जी सांगतील तीच औषधं घ्यावीत म्हणजे लवकर आणि योग्य गुण येईल.