मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 4 जानेवारी 2023 (20:25 IST)

पौगंडावस्थेतच चेहऱ्यावर पिंपल्स का येतात? त्यावर उपाय काय? कोणती काळजी घ्यावी?

pimples
खरंतर तारुण्यपीटिका हा सर्वसामान्य त्वचेचा आजार आहे. तारुण्यपीटिकांमुळे त्वचेवर पुरळ येतं, त्वचा तेलकट होते. काहीवेळेला तारुण्यपीटिकांमुळे दुखतंही.
 
ब्रिटिश आरोग्य खात्याने केलेल्या अभ्यासानुसार तारुण्यपीटिका केव्हाही येऊ शकतात.
11 ते 30 या वयात 95 टक्के लोकांच्या चेहऱ्यावर तारुण्यपीटिका येतात. 25व्या वर्षापर्यंत तारुण्यपीटिका आपोआप जातात. महिलांना गरोदरपणात तसंच मासिक पाळीदरम्यान चेहऱ्यावर तारुण्यपीटिका येऊ शकतात.
डाएट म्हणजे पोषणमूल्यांच्या अभावामुळे, अस्वच्छ भवतालामुळे तसंच लैंगिक संबंधांमुळे तारुण्यपीटिका चेहऱ्यावर येतात हे सिद्ध झालेलं नाही.

तारुण्यपीटिकांनी चेहऱ्यावर केवळ व्रण राहतो एवढंच नाही तर मानसिकदृष्ट्याही त्रास होतो. चेहऱ्यावर तारुण्यपीटिका आल्यामुळे अनेकांना चिंता भेडसावते. काहींना नैराश्याचा त्रासही जाणवतो.
स्किन अँड हेअर स्पेशालिस्टमधील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. श्याम मंकडिया यांनी सांगितलं की, तारुण्यपीटिका चेहऱ्यावर का येतात याची अनेक कारणं आहेत. हार्मोनमध्ये होणाऱ्या बदलांमुळे तारुण्यपीटिका येतात.
 
पौंगंडावस्थेत शरीरातल्या हार्मोन्सच्या पातळीत बदल होतो. त्यावेळी चेहऱ्यावरच्या ग्रंथींमधून तेल स्रवतं. त्यामुळे ग्रंथी विस्तारतात आणि त्यामुळे तारुण्यपीटिका चेहऱ्यावर येतात.
 
ब्रिटिश आरोग्य विभागानुसार तारुण्यपीटिका केव्हाही चेहऱ्यावर येतात. 95 टक्के वेळा तारुण्यपीटिका 11 ते 30 वयात होतात. 25व्या वयानंतर तारुण्यपीटिका आपोआप जातात.
 
आईवडिलांपैकी कोणाला तारुण्यपीटिकांचा त्रास असेल तर मुलांनाही हा त्रास होण्याची शक्यता असते.
डॉ. श्याम मंकडिया पुढे सांगतात, "तारुण्यपीटिकांचे चार प्रकार असतात. तारुण्यपीटिका ज्या पौगंडावस्थेच्या सुरुवातीला येतात त्यांना वैद्यकीय परिभाषेत 'कॉमेडोन्स' असं म्हणतात.
 
तारुण्यपीटिका येण्याची ही सुरुवात असते. या तारुण्यपीटिका पांढऱ्या किंवा काळ्या रंगाच्या असतात. यामुळे त्वचेवर लाल व्रण राहतात. याने पुरळही उठतं. तारुण्यपीटिका मोठ्या आकाराच्या असतात.
 
तारुण्यपीटिका आल्यास काय काळजी घ्यावी?
डॉ. मंकडिया सांगतात, की पहिलं काळजी म्हणजे पाणी.
 
"चेहऱ्यावर तारुण्यपीटिका आल्या असतील तर तुम्ही दिवसात तीन ते चार लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. जेवढं जास्त पाणी प्याल तेवढ्या तारुण्यपीटिका कमी होतील."
 
आणखी एक काळजी घेऊ शकतो ते म्हणजे शरीरातलं तेलाचं प्रमाण कमी करणे. चॉकलेट, चीज अशी डेअरी उत्पादनं खाणं कमी करणं.
 
भाज्या, आंबट फळं यांचे अधिकाअधिक सेवन करावं. जेणेकरुन चेहऱ्याला तजेला येईल.
 
उपचार
तारुण्यपीटिकांवर उपचार होणं आवश्यक आहे. योग्य वेळेत उपचार झाले तर त्याचे व्रण राहत नाहीत. चेहरा खराब होत नाही.
 
अनेकदा तारुण्यपीटिकेचा व्रण चेहऱ्यावर दिसू लागल्यानंतर लोक आमच्याकडे येतात. अशा परिस्थितीत उपचार प्रदीर्घ काळ घ्यावे लागतात आणि खर्चही वाढतो.
 
तारुण्यपीटिकांच्या बाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे. खाण्यापिण्याची काळजी घेणं आवश्यक आहे. किंडामायसिन, बिंगलपॅराक्साईड ही औषधं तारुण्यपीटिकांवर उपयोगी ठरतात. आणखी एक उपाय म्हणजे लेप किंवा मलम चेहऱ्याला लावणं.
 
तिसरा उपाय म्हणजे लेसर उपचारपद्धती.
ब्रिटिश आरोग्य विभागानुसार तारुण्यपीटिकांवरचे उपचार तीन महिन्यांपर्यंत सुरु राहतात. एका दिवसात त्या बऱ्या होत नाहीत.
 
तारुण्यपीटिकांवर घरगुती उपचार
ब्रिटिश आरोग्य विभागानुसार तारुण्यपीटिका आहे तो भाग स्वच्छ पाण्याने धुवा. पण दिवसातून दोनपेक्षा जास्त वेळा नको. सतत चेहरा धुतला तर त्वचेला त्रास होऊ शकतो. त्रास वाढू शकतो.
 
नेहमीचा साबण, क्लिसनर किंवा कोमट पाण्याने चेहरा धुवा.
 
खूप गरम पाणी किंवा एकदम थंड पाण्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. काळे व्रण, डाग फोडण्याचा प्रयत्न करु नका. तसं केलं तर जखम चिघळू शकते. कायमस्वरुपी व्रण राहू शकतो.
 
मोठ्या प्रमाणावर मेकअप किंवा कॉस्मेटिक्सचा वापर करु नका.
 
तेलकट स्वरुपाचा मेकअप, स्किनकेअर आणि सनकेअर उत्पादनं ज्यांना कॉमडोजेनिक म्हटलं जातं ते टाळा. पाण्याचा वापर होणारी नॉन कॉमडोजेनिक गोष्टी वापरा. झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरचा मेकअप काढून टाका.
 
नियमित व्यायाम केल्याने तारुण्यपीटिका कमी-जास्त होणार नाहीत. पण व्यायाम केल्यामुळे तुमचा मूड चांगला होऊ शकतो. व्यायाम केल्यावर आंघोळ करायला विसरु नका. कारण घामामुळे त्वचेला खाज सुटू शकते. तुमचे केस नियमितपणे धुवा, ते चेहऱ्यावर येणार नाहीत याची काळजी घ्या.
 
तारुण्यपीटिका चेहऱ्यावर येणारच नाही असं काही नसतं पण उपचारांमुळे त्या नियंत्रणात राहू शकतात.
 
तारुण्यपीटिका वाढल्या तर डॉक्टरांचा लगेचच सल्ला घ्या. त्वचेवर पुरळ आल्यास अनेक क्रीम्स, मलमं, लेप उपलब्ध आहेत. बेन्झॉल कमी प्रमाणात असलेली औषधं दिली जाऊ शकतात.
 
तारुण्यपीटिका छातीवर किंवा पाठीवर येऊ लागल्या तर अँटीबायोटिक्सचे उपचार घ्यावे लागू शकतात. क्रीम लावावे लागू शकते. त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरेल.

Published By- Priya Dixit