गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 24 जून 2021 (17:20 IST)

‘डेक्कन क्वीन’नंतर पंचवटी आणि जनशताब्दी एक्स्प्रेसलाही हिरवा कंदील

मुंबई : राज्यातील कोरोनाची साथ नियंत्रणात आल्यानंतर आता रेल्वे प्रशासनाकडून मुंबई-नाशिक प्रवासासाठी पंचवटी आणि जनशताब्दी एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार पंचवटी एक्स्प्रेस शुक्रवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे मुंबई-नाशिक अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 
एप्रिल २०२० पासून पंचवटी एक्स्प्रेस बंद असल्याने अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला होता. पंचवटी एक्स्प्रेस सुरू होणार असली तरी कोचची संख्या कमी केल्यामुळे प्रवासी संघटना नाराज आहेत. लवकरच रेल्वे प्रशासनाकडून राजधानी, तपोवन, राज्यराणी एक्स्प्रेस देखील सुरू करण्यात येणार आहे.
 
मुंबई-पुणे प्रवासासाठी दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन येत्या २६ तारखेपासून पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहे. महत्वाचे म्हणजे आता डेक्कन क्वीनला विस्टाडोम कोच जोडले गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास हा अजून आनंदी व सुखकारक होईल. व्हिस्टाडोम कोच विशेषतः पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीतून तयार केले गेले आहेत. या कोचची खास अशी रचना केली गेली आहे की गाडी ताशी १८० किमीपर्यंत सहज वेग पकडू शकेल. या कोचमध्ये प्रवास करताना, प्रवासी त्यांच्या आरामदायक सीटवर बसून बाहेरचे दृश्य पाहू शकतील. वाय-फाय सह प्रवासी माहिती प्रणाली, स्वयंचलित आणि मोठे स्लायडिंग दरवाजे प्रवास अधिक मनोरंजक बनवतात.