सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (10:28 IST)

ATM ने पैसे काढणं नवीन वर्षात महागणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

नवीन वर्षापासून ग्राहकांसाठी बँकिंग सेवा महाग होणार आहे. १ जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी जास्त शुल्क भरावे लागणार आहे. जूनमध्येच रिझर्व्ह बँकेने बँकांना मोफत मर्यादेनंतर शुल्क वाढवण्याची परवानगी दिली, जी नवीन वर्षापासून लागू होईल.
 
RBI च्या मते, प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांना रोख रक्कम आणि इतर वित्तीय सेवांसाठी दरमहा एक विनामूल्य मर्यादा सेट करते. यापेक्षा जास्त सेवा वापरण्यासाठी बँका शुल्क आकारतात. 
रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले होते की, अधिक इंटरचेंज चार्जेस आणि खर्च वाढल्यामुळे बँकांना एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क वाढवण्याची परवानगी आहे. आता अॅक्सिस, एचडीएफसीसह इतर सार्वजनिक आणि खासगी बँकांमधून पैसे काढल्यावर अधिक शुल्क भरावे लागणार आहे. 
 
दर महिन्याला आठ मोफत व्यवहार
बँका सध्या ग्राहकांना दर महिन्याला आठ मोफत व्यवहार ऑफर करतात. यामध्ये आर्थिक आणि गैर-आर्थिक दोन्ही व्यवहारांचा समावेश आहे. ग्राहकाचे खाते असलेल्या बँकेच्या एटीएममधून दर महिन्याला पाच मोफत व्यवहार उपलब्ध आहेत. याशिवाय, तुम्ही मेट्रो शहरातील इतर बँकांच्या एटीएममधून तीन आणि नॉन-मेट्रो शहरांमधील इतर बँकांच्या एटीएममधून पाच विनामूल्य व्यवहार करू शकता. सध्या एटीएममधून प्रत्येक पैसे काढण्यासाठी 20 रुपये आकारले जातात, जे 1 जानेवारीपासून 21 रुपये होणार आहेत. यावर सेवा कराच्या रूपात जीएसटीही भरावा लागेल.
 
वाढीव इंटरचेंज फी ऑगस्टपासून लागू
रिझर्व्ह बँकेने ऑगस्टपासून बँकांमधील एटीएमवरील इंटरचेंज फीचे वाढलेले दर लागू केले आहेत. इंटरचेंज फीसाठी बँकांना आता 15 रुपयांऐवजी 17 रुपये प्रति व्यवहार द्यावे लागतील. हे शुल्क सर्व आर्थिक व्यवहारांवर लागू आहे, तर गैर-आर्थिक व्यवहारांसाठी इंटरचेंज शुल्क 5 रुपयांवरून 6 रुपये झाले आहे.
 
इंटरचेंज फी म्हणजे बँक आपल्या ग्राहकाला दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरण्याची परवानगी देते, ज्यासाठी त्याला संबंधित एटीएमसह बँकेला फी भरावी लागते. बँका त्यांच्या ग्राहकांकडूनच या शुल्काची परतफेड करतात.