मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 23 जानेवारी 2021 (09:19 IST)

मार्चपासून 100, 10 आणि 5 रुपयाच्या जुन्या नोटा होणार चलनातून बाद : RBI

येत्या मार्च महिन्यापासून 100 रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून बाद होतील. त्याबरोबरच 10 रुपये आणि 5 रुपयाच्या जुन्या नोटाही चलनातून बाद होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) महाव्यवस्थापक बी.एम. महेश यांनीही माहिती दिली. म्हणजेच 1 एप्रिलपासून 100 रुपयाच्या फक्त नवीन नोटाच वापरल्या जाणार आहेत.
 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री आठ वाजता अचानक नोटबंदी जाहीर करत 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. मोदी यांच्या नोटबंदीला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यात आता ही नवीन नोटबंदी येणार आहे.
 
जिल्हास्तरीय सुरक्षा आणि जिल्हास्तरीय चलन व्यवस्थापन समितीची बैठक जिल्हा पंचायत नेत्रावती सभागृहात नुकतीच झाली. या बैठकीत बोलताना महेश यांनी ही माहिती दिली. सध्या चलनात असलेल्या 100 रुपयाच्या बहुतेक नोटा बनावट असल्याने जुन्या 100 रुपयांच्या नोटा मागे घेण्यात येतील. गेल्या सहा महिन्यांपासून आरबीआयने या नोटांची छपाई बंद केली आहे. या निर्णयामुळे लोकांनी घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. हा निर्णय फक्त नवीन नोटा चलनात आणण्यासाठी घेण्यात आला आहे, असे महेश म्हणाले.