शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 29 जुलै 2019 (12:37 IST)

माझ्या कारकिर्दीतील सर्व चित्रपट एका बाजूला आणि ‘बाबा’ एका बाजूला! - दीपक दोब्रियाल

दिपक दोब्रीयाल यांनी ‘तनु वेडस मनू’, ‘हिंदी मिडीयम’ यांसारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र त्यांचा आगामी मराठी चित्रपट ‘बाबा’ हा त्यांच्यासाठी अत्यंत वेगळा आणि समाधान देणारा चित्रपट ठरला. ते म्हणतात की, त्यांची बारा वर्षांची चित्रपट कारकीर्द एका बाजूला आणि हा चित्रपट एका बाजूला! त्यांच्या दहा हिंदी चित्रपटांनी जेवढे समाधान दिले नाही तेवढे समाधान त्यांना या चित्रपटाने दिले, असेही दोब्रीयाल ठासून सांगतात.
 
दीपक दोब्रियाल हे राज आर गुप्ता दिग्दर्शित ‘बाबा’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करत आहेत. या चित्रपटाची संयुक्त निर्मिती संजय एस दत्त प्रॉडक्शन्स आणि ब्ल्यु मस्टँग क्रिएशन्सने केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या प्रवेशाबाबत आनंद व्यक्त करताना दीपक दोब्रियाल म्हणतात, “इथे मला एवढे प्रेम मिळाले कि, मी मराठी चित्रपटात काम करत आहे असे मला वाटळेच नाही. जेथे भरभरून सर्जनशील काम होते अशा एका चित्रपटसृष्टीत काम करण्याचा करण्याची संधी मला मिळते आहे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. मराठीतील चित्रपट पाहिल्यावर या चित्रपटसृष्टीचे वेगळेपण लक्षात येते.”
‘बाबा’ हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत असून या चित्रपटाबद्दल बोलताना दोब्रीयाल म्हणाले, “माझ्या बारा वर्षांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपटांनी जेवढे समाधान दिले नाही तेवढे संचित मी ‘बाबा’मधून कमावले आहे. मी आतापर्यंत जे हिंदी चित्रपट केले त्या सर्व चित्रपटांच्या तुलनेत हा चित्रपट सरस आहे. या चित्रपटाने मला पुनर्जन्म दिला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या सर्वच गोष्टींसाठी मी मराठी चित्रपटसृष्टीचा नेहमीच ऋणी राहीन.
 
या चित्रपटाचे दिग्दर्शक राज आर गुप्ता यांनी ‘धागा’ या मराठी लघुपटाचे यापूर्वी दिग्दर्शन केले आहे. ‘बाबा’ची सहनिर्मिती संजय दत प्रॉडक्शन्सने ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्सच्या अशोक सुभेदार आणि आरती सुभेदार यांच्याबरोबर केली आहे. ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्सने माधुरी दीक्षितची भूमिका असलेल्या ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाची निर्मिती केली होती.
 
‘बाबा’मध्ये दोब्रियाल एका मुख्य आणि बहिऱ्या वडिलांची व्यक्तिरेखा साकारत आहेत. ते म्हणतात की, न बोलता स्वतःला व्यक्त करणे ही बाब त्यांच्यासाठी आव्हानात्मक होती. “अशाप्रकारे संपूर्ण चित्रपट चित्रित करणे कठीण होते. सुरुवातीला मला वाटले की, मी केवळ यातील काही दृश्यं चित्रित करू शकतो, पण अशा प्रकारची व्यक्तिरेखा संपूर्ण चित्रपटात साकारणे आणि ती व्यक्तिरेखा जगणे ही बाब अत्यंत आव्हानात्मक अशीच होती,” ते म्हणतात. त्यांना त्यांच्या सहकलाकारांकडून जे सहकार्य आणि मदत मिळाली त्याबद्दल ते भरभरून बोलतात. ते पुढे म्हणतात,“हिंदी चित्रपटांमध्ये तुमचे सहकारी कलाकार कोणती व्यक्तिरेखा साकारत आहेत याबद्दल कोणालाच काही देणेघेणे नसते. अगदी भावनिक दृश्यंही एकमेकांकडे न पाहताच दिली जातात. पण इथे प्रत्येक कलाकार हा त्याची व्यक्तिरेखा प्रामाणिकपणे जगत असतो. मला प्रत्येक सहकलाकाराने उत्तम सहकार्य आणि मदत केली. अगदी कलाकारच नाही तर या चित्रपटाशी जोडला गेलेला प्रत्येकजण, प्रत्येक तंत्रज्ञ हा या चित्रपटाबद्दलबरोबर जगत होता.”
 
दोब्रीयाल म्हणतात की, या चित्रपटाची संकल्पना आणि कथा यामुळे त्यांनी मराठी चित्रपट करण्याचे ठरवले. “बाबा’ची संकल्पना ऐकली तेव्हा माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला मागे सारून मी हा चित्रपट करण्याचे ठरवले. मी तात्काळ या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला तारखांबद्दल विचारले आणि असेही सांगितले की, या चित्रपटासाठी चार महिने मी राखून ठेवत आहे व इतर सर्व गोष्टी बाजूला सारत आहे. जर हा चित्रपट मला मिळाला नसता तर मी आयुष्यात बरेच काही ‘मिस’ केले असते. या संधीसाठी मी राज आर गुप्ता यांचा शतशः आभारी आहे. चित्रपटाच्या संकल्पनेच्या व्यतिरिक्त या चित्रपटाने मला माझी इमेज नव्याने तयार करण्याची संधी दिली. मी विनोदी भूमिका केल्या आहेत, खलनायकाच्या भूमिका केल्या आहेत पण ‘बाबा’मुळे माझ्या इमेजला कलाटणी मिळणार आहे,” ते म्हणतात. 
या चित्रपटात दीपक दोब्रियाल यांच्या व्यतिरिक्त नंदिता पाटकर, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर, शैलेश दातार, जयंत गडेकर आणि बालकलाकार आर्यन मेंघजी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला रोहन रोहन यांचे संगीत असून पार्श्वसंगीत सुस्मित लिमये यांचे आहे. या चित्रपटाची कथा मनिष सिंग यांनी लिहिली आहे. 
 
दोब्रियाल म्हणतात की, या चित्रपटाने त्यांना त्यांच्या आयुष्यातही बदल घडवून आणण्यास मदत केली आहे. “या चित्रपटाने माझ्या आयुष्याचा अर्थच बदलला आहे. सामाजिक संदेशांबद्दलच्या माझ्या जाणिवा अधिक जागृत झाल्या. या चित्रपटाने मला समृद्ध तर केलेच पण तो इतर चित्रपटांपेक्षा वेगळा आहे हेसुद्धा सिद्ध केले. ‘बाबा’ करत असताना हा माझा पहिला मराठी चित्रपट आहे, असे कधीच वाटले नाही.”
 
या चित्रपटाच्या तयारीविषयी बोलताना दोब्रियाल म्हणतात, “बाबा’चे चित्रीकरण सुरू करण्याआधी आम्ही एक कार्यशाळा घेतली होती. या कार्यशाळेमुळे चित्रपटाच्या संकल्पनेबद्दल अधिक स्पष्टता आली आणि त्याचबरोबर सहकलाकारांबरोबर ऋणानुबंध प्रस्थापित करता आले. चित्रीकरणादरम्यान त्याची खूप मदत होते. या चित्रपटाची भाषा वेगळी आहे. ‘साईन लँग्वेज’ प्रेक्षकांना समजायला कठीण जाऊ नये किंवा तीमध्ये तांत्रिकता येऊ नये, याची काळजी आम्हाला घ्यावी लागली. त्यातून मग आम्ही आमची स्वतःची भाषा विकसित केली. प्रेक्षकांना समजायला ती साधी, सरळ, सोपी असावी अशी त्यामागील भावना होती. त्याचवेळी आम्हाला या संकल्पनेतील गांभीर्यही अजिबात कमी करायचे नव्हते. ज्या समाजघटकांवर हा चित्रपट बेतला आहे त्यांच्या भावनांचा, त्यांच्या अडचणींचा कोणताही अपमान होणार नाही किंवा त्यांच्या अस्मितेला कोणतीही ठेच पोहोचणार नाही, याची काळजीसुद्धा त्याचवेळी आम्हाला घ्यायची होती,” ते म्हणतात.
 
दोब्रीयाल यांनी मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी संस्कृतीबद्दलही गौरवोद्गार काढले आहेत. ते म्हणतात की, रत्नागिरीमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण होत असताना तेथील गावकऱ्यांनी जी प्रगल्भता दाखवली आणि ज्या पद्धतीने चित्रपटाचा संदेश चर्चिला गेला त्यातून येथील संस्कृती ध्यानात येते.