शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 2 जून 2024 (10:40 IST)

छाया कदम : आईला विमान प्रवास घडवायचा राहून गेला, पण तिची साडी-नथ घेऊन गेले आणि...

BBC/CHHAYA KADAM INSTAGRAM
BBC/CHHAYA KADAM INSTAGRAM
“हा पल्ला तसा सोपा नव्हता, पण मी स्वतः निवडला होता. त्यादिवशी (कानमध्ये स्क्रीनिंगनंतर आठ मिनिटं स्टँडिंग ओव्हेशन मिळालं तेव्हा) हे सगळं समोरून येऊन गेलं... सुरुवात कशी होती, एकेका सीनसाठी आपण कसे काम शोधायचो, हे सगळं डोळ्यांसमोर आलं.
 
"तो अनुभव शब्दांत मांडता येणार नाही. ती जादूच असते आणि ती प्रत्येक कलाकाराला अनुभवता आली पाहिजे. मी खूश आहेच. पण पहिल्या सिनेमापासून ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि काम करण्याची संधी दिली, त्या सगळ्यांमुळेच हा आत्मविश्वास वाढत गेला.”
 
काही दिवसांपूर्वी कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'ऑल वुई इमॅजिन अॅज अ लाइट' या फिल्मचं स्क्रीनिंग झालं. पायल कपाडिया यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमाला स्क्रिनिंगनंतर तब्बल आठ मिनिटांचं स्टॅंडिंग ओव्हेशन मिळालं. या कौतुकासोबतच चित्रपटाला प्रतिष्ठेचा असा ग्रां प्री पुरस्कारही मिळाला.
 
या सिनेमाच्या आनंदी, काहीशा भावूक झालेल्या टीममधला एक चेहरा मराठी प्रेक्षकांसाठी नवीन नव्हता. हा चेहरा होता अभिनेत्री छाया कदम यांचा.
 
छाया यांच्या 'ऑल वुई इमॅजिन अॅज अ लाइट'चं कौतुक झालंच, पण त्यांच्या 'सिस्टर मिडनाइट' या सिनेमाचंही कानमध्ये स्क्रीनिंग झालं, त्यांच्या साडी आणि नथ या मराठमोळ्या लुकचीही चर्चा झाली.
 
छाया यांच्याशी बीबीसी मराठीने 'कान'वारीबद्दल, तिथल्या अनुभवांबद्दल संवाद साधला. तसंच, त्यांचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवासही जाणून घेतला.
 
छाया यांनी कानमधे स्क्रीनिंग झालेल्या त्यांच्या दुसऱ्या चित्रपटाबद्दलही सांगितलं.
 
“कानमध्ये माझ्या डिरेक्टर्स फोर्टनाइट कॅटेगरीमध्ये सिस्टर मिडनाइट. या सिनेमाचं स्क्रीनिंग झालं होतं. यात राधिका आपटेची प्रमुख भूमिका होती. तिनेही खूप अप्रतिम काम केलं आहे. 'ऑल वुई इमॅजिन अॅज अ लाइट' आणि 'सिस्टर मिडनाइट' या सिनेमाचे विषय वेगळे होते. पण खूप छान होत्या दोन्ही फिल्म.”
 
‘आईची साडी आणि नथ घालून फिरले... तिच्याशी गप्पा मारल्या’
कानमध्ये छाया यांनी घातलेल्या साडी आणि नथीची खूप चर्चा झाली. या दोन्ही गोष्टी त्यांच्या आईच्या होत्या आणि म्हणूनच त्यांच्यासाठी त्या खूप खास होत्या.
 
छाया यांनी सांगितलं, “माझ्यासाठी कान फिल्म फेस्टिव्हल अटेंड करणं ही खूप मोठी गोष्ट होती. त्याच्याही आधी प्रत्येकवेळी मला माझी आई माझ्यासोबत लागायची. आईला विमानाचा प्रवास घडवता आला नाही. तो राहून गेला. आता ती गेल्यावर मला जास्त जाणवायला लागलं. मग जेव्हा हे कान फिल्म फेस्टिव्हलचं कळलं तेव्हा मग मनात आलं की, ही आईची साडी आहे, जी तिला नेसवायची राहूनच गेलं. तेव्हा मग मी आईला नाही, तर आईची साडी आणि आईची नथ जी तिच्या लग्नातली होती, ती सोबत घेऊन गेले."
 
जी गोष्ट हातातून सुटून गेली, त्याबद्दल आपण काही करू शकत नाही. पण वाटलं आपल्याला यातून काहीतरी समाधान मिळेल. त्यामुळे तिची नथ-साडी घातली आणि कानमध्ये फिरले त्यादिवशी. खूप गप्पा मारल्या तिच्याशी.”
 
‘त्या दिवशी आम्हालाच खूप भारी वाटलं’
कानमध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या ‘ऑल वुई इमॅजिन अॅज अ लाइट’ची टीम जेव्हा मंचावर गेली, तेव्हा कौतुकासाठी अजून एक कारण होतं...या टीममध्ये सगळ्या मुली होत्या. या चित्रपटाची दिग्दर्शक पायल कपाडिया, अभिनेत्री कानी कस्तुरी, दिव्या प्रभा आणि छाया कदम.
 
त्यामुळे खास बनलेल्या या क्षणांबद्दल छाया सांगतात, “आम्हाला स्वतःलाच ते इतकं भारी वाटत होतं ना. या फिल्मच्या पहिल्या मीटिंगपासूनची ताकद आहे की, त्या टीममध्ये मुली जास्त आहेत. आणि प्रत्येक मुलगी स्वतंत्र विचारांची आहे. अशा मुली एकत्र येऊन एक प्रोजक्ट करणं हे भारी होतं. त्यादिवशी खरंच आम्हालाच खूप मस्त वाटत होतं.
 
आमची अशी नेहमी चर्चा व्हायची की, आम्ही स्वतःचा असा मार्ग निवडला आहे. आपल्या आपल्या मार्गाने एकत्र जायचं अस ठरवलेल्या आम्ही एकत्र आलो. आमच्यासोबत लोकांनाही खूप मस्त वाटतंय.”
 
‘बायका कोणताही विषय वेगळ्या पद्धतीने हाताळू शकतात’
स्वतंत्र विचारांच्या मुलींबद्दल बोलताना ओघानेच विषय काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या लापता लेडीजचाही निघाला. लापता लेडीजमधील छाया यांच्या मंजू माईच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं.
 
ही भूमिका छाया यांना कशी मिळाली आणि या सिनेमाची दिग्दर्शक किरण राव असेल किंवा वुई ऑल इमॅजिन अज अ लाइटची दिग्दर्शक पायल कपाडिया...महिला दिग्दर्शकांसोबत काम करण्याचा छाया यांचा अनुभव कसा होता?
 
आधी लापता लेडीजबद्दल बोलताना छाया यांनी म्हटलं की, “त्यांनी माझी आधीची कामं बघितली होती. त्यांनी फोन केला मी भेटले. आणि पुढच्या कामाला सुरुवात झाली.”
 
त्यांनी पुढे सांगितलं की, “महिला दिग्दर्शकांबद्दल बोलायचं तर मी यापूर्वी पण महिला दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. मी 'ये रे ये रे पावसा' नावाचा चित्रपट केला होता. त्याची दिग्दर्शक शफक खान होती. जेव्हा तोच तोच मार्ग न स्वीकारता महिला वेगळ्या मार्गाने निघतात, तेव्हा मला खूप छान वाटतं.
 
जसं शफकच्या बाबतीत झालं की, तिचा फोन आला. एक मुलगी...नॉन महाराष्ट्रीयन मुलगी...ती मराठी सिनेमा दिग्दर्शित करत आहे. पहिल्याच मीटिंगमध्ये मी म्हटलं की, मी करतीये काम.”
 
“बायका कोणताही विषय वेगळ्या पद्धतीने हाताळू शकतात आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं आहे. जसं किरणने ‘लापता लेडीज’मध्ये काहीच्या काही करून दाखवलं आहे.”
 
‘प्रत्येक कॅरेक्टरची एक तरी गोष्ट सोबत राहते’
छाया कदम यांच्या आजपर्यंतच्या भूमिका पाहिल्या तर न्यूडमधली चंद्राक्का असो, सैराटमधली सुमन ताई किंवा अगदी आताच्या लापता लेडीजमधील मंजू माई...सर्व स्त्रिया कणखर, स्वतःच्या शर्तीवर जगणाऱ्या आहेत.
 
वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार पचविणाऱ्या छाया कदम या स्वतः या व्यक्तिरेखांप्रमाणेच खंबीर आहेत का? आयुष्यातल्या भल्या-बुऱ्या प्रसंगात या भूमिकांनी त्यांना काय शिकवलं?
“वैयक्तिक आयुष्यातही मी कणखर आहे. छोट्या-छोट्या गोष्टींनी हार मानणारी मुलगी नाहीये. पण कधीकधी असं होतं ना की, लहान गोष्टींचा परिणाम होतो. त्यावेळी मी जी काही कॅरेक्टर्स केली आहेत, ती माझ्या मदतीला येतात. फिल्म खूप परिणाम करते.
 
मग मी स्वतःला समजावते की, चंद्राक्काकडे बघ ना...तिने यमुनाला शिकवलं की कसं स्वतःच्या हिमतीवर जगायचं किंवा अरे म्हटलं की कारे करायचं असतं... आता मंजू माई आली जी सांगते की, खुद के साथ रहना बहुत मुश्किल होता है...ते इतकं भारी आहे ना...”
 
“मला असं वाटतं की, मीच नाही तर प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत हे होत असावं की, तुमच्या कॅरेक्टरची एखादी तरी गोष्ट तुमच्यासोबत राहते. ती कायम कोणत्याही चांगल्या वाईट प्रसंगी तुमच्यासाठी धावून येते.”
 
‘माझ्या डोळ्यांत दिसतं...मला नाही सापडलंय कॅरेक्टर’
इतक्या वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या छाया कदम यांना एखाद्या भूमिकेचा सूर सापडलाच नाही असं कधी होत असेल का असा प्रश्न पडला.
 
एखादं कॅरेक्टर शोधताना क्रिएटिव्ह ब्लॉक आलेत किंवा ते सापडतच नाहीये, असं कधी झालंय का, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, “असं होत असतं. कधीकधी अचानक एखाद्या सीनला असं होतं की, नाही सापडत. किंवा आपलं म्हणणं वेगळं असतं त्या कॅरेक्टरला घेऊन, त्याच्या इमोशन्सना घेऊन आणि दिग्दर्शकाचं म्हणणं वेगळं असतं. ते जुळत नाही, तोपर्यंत नाही स्क्रीनवर दिसत.”
 
त्यांना याबद्दलचा स्वतःचा अनुभव शेअर केला.
 
“आता नुकतंच माझं असं झालं एका कॅरेक्टरच्या बाबतीत. मला सापडतच नव्हतं. आणि मी रिटेकवर रिटेक करत होते...इतक्या वर्षांत कधी झालं नव्हतं. दिग्दर्शकाचं म्हणणं होतं की, काहीतरी करून होईल ते. पण मी मरेपर्यंत मला माहीत असतं की, ते दिसतंय डोळ्यांत माझ्या...मला नाही सापडलंय कॅरेक्टर.”
 
“अशावेळी कधीकधी मार्ग सापडतो, कधी नाही सापडत. पण असं खूप वेळा नाही होत. पण त्यादिवशी मी हात वर केले होते. दिसताना ते तसं नाही दिसणार कदाचित. कारण वेगवेगळे शॉट घेतलेले असतात. पण कलाकार म्हणून आपल्याला हे जाणवत असतं की या पेक्षा चांगला झाला असता हा सीन.”
 
‘धडपड करण्यात पाच वर्षं निघून गेली आणि पहिला ब्रेक मिळाला’
छाया कदम यांच्या घरात अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नाही. मुंबईतील मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता. मुंबईच्या कलिना या भागामध्येच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचे वडील गिरणी कामगार होते.
 
अशावेळी अभिनयासारख्या क्षेत्रात येणं, टिकून राहणं आणि स्वतःला सिद्ध करणं हे किती अवघड होतं, हेही छाया यांनी सांगितलं.
 
त्यांनी म्हटलं, “आपला स्ट्रगल घरूनच सुरू होतो. आपण काय करतोय हे घरच्यांना समजावून सांगणं इथून गोष्टी सुरू होतात. आपल्याला आवडतं म्हणून आपण हे सुरू करतो. पण याचं पुढे काय होणार आहे, कामं मिळणार आहेत, नाही मिळणार आहेत. कामं मिळाली की आपण नक्की किती कमावणार आहोत, वयाच्या कोणत्या टप्प्यावर कमावणार आहोत, यातलं आपल्याला काही माहीत नसतं.”
“घरातल्यांच्या आपल्याकडून वेगळ्या अपेक्षा असतात. मुलीकडून तर असतातच. तुम्हाला कमयावचं आहे, लोक काय म्हणतील. लग्न व्हायचं आहे तुझं. या सगळ्या गोष्टींना मी पण तोंड दिलं आहे. पण मी सुरूवातीपासूनटॉम बॉइश अशी आहे. मी लोकांचा विचार न करता पुढे गेले.”
 
आपली अभिनयाची सुरूवात कशी झाली हे त्यांनी पुढे सांगितलं.
 
“मी 2001 साली रंगभूमीचं एक वर्कशॉप केलं. तेव्हा असं झालं की हे करायला मजा येतीये. त्यावेळी म्हटलं की हेच करायचं. पण म्हणजे नक्की काय हे कळत नव्हतं. तेव्हा तेव्हा जी संपर्कात होती जी माणसं ती सांगतील तसं याला भेटून ये, त्याला भेटून ये. फोटो दे असं मी माझ्या माझ्या परीने करत होते.
 
धडपड करण्याकरण्यात पाच वर्षं निघून गेली आणि पहिलं नाटक आलं 2006 मध्ये. प्राध्यापक वामन केंद्रेंनी दिग्दर्शित केलेलं झुलवा नाटक हा माझा पहिला ब्रेक होता आणि पहिला ब्रेक नेहमीच खास असतो.
त्यानंतर सुरू झालेल्या अभिनय प्रवासात छाया ताईंनी अनेक उत्तमोत्तम दिग्दर्शकांसोबत काम केलं.
 
त्यांच्यासोबत काम करताना आलेल्या अनुभवाबद्दल त्यांनी सांगितलं की, “ही माणसं कमाल आहेत. काम आणि माणूस म्हणून घडायला यांची मदत झाली.
 
कलाकार म्हणून जी शिस्त हवी, ती संजय लीला भन्साळींकडे पाहायला मिळाली. रवी जाधव सारख्या दिग्दर्शकाकडे हसतखेळत काम कसं करायचं हे शिकता आलं.”
 
“महेश मांजरेकर माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्यांच्यासोबत मी ‘वरण भात लोन्चा, कोन नाही कोन्चा’ आणि ‘अंतिम’ हे दोन चित्रपट केले. त्यांच्यासोबत काम करणं हे वेगळी मजा आहे. मी त्यांना अगदी सहज आठवण आली म्हणूनही फोन करते.
 
नागराज मंजुळे आणि आम्ही फॅमिलीसारखे असलो, तरी त्या त्या भूमिकांसाठी मी योग्य आहे असं वाटलं तरच तो कास्ट करतो.”
 
‘लोकांना आता माणसांच्या गोष्टी ऐकायला आवडतात’
सिने इंडस्ट्रीमध्ये एक काळ असा होता, जेव्हा लोकांना वाटायचं की हिरॉईन किंवा हिरो म्हणजे असेच दिसायला हवेत, त्यांची एक प्रतिमा डोक्यात असायची. पण गेल्या काही दिवसांते हे चित्र बदललेलं पाहायला मिळालं. लोकांचे नायक-नायिकेच्या रंगरुपाबद्दलचे ठराविक आडाखे आता बदलत आहेत आणि केवळ अभिनयाच्या जोरावर स्वतःला सिद्ध करणारे कलाकार पुढे येताना दिसत आहेत.
 
छाया कदम यांच्याबद्दलही हे म्हणता येईल.
 
या बदलाबद्दल त्यांनी म्हटलं की, “हिरो-हिरॉईनवाले दिवस गेले असं मला वाटतं. आता लोकांना माणसांची गोष्ट पाहायला आवडते. लोकांना आता खोट्या गोष्टी कळतात. मेक अप करून भाजी निवडता, स्वयंपाक करता हे खोटं आहे हे कळतं.”
 
“आता तुमची कथा तुमची हिरो झाली आहे आणि माणसं माझ्यासारखीच असतात. माझ्या संपर्कातले खूप कमी लोक आहेत. ज्यांना हिरो व्हायचंय. त्यांना आता खरं काम करायचं आहे आणि चांगलं काम करायचं आहे.”
 
कान फिल्म फेस्टिव्हलसारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर झळकल्यानंतर आता पुढे काय, स्वतःला सिद्ध करण्याचा स्ट्रगल सुरूच राहणार का, याबद्दल छाया कदम यांनी म्हटलं की, “मी कानला जाऊन आले, सगळं भरून घेऊन आले. पण आणखी काही दिवसांनी झालं हे संपलं. मग पुन्हा नव्याने कामाला सुरूवात, नव्याने शोध. जे वाट्याला येईल ते करणार. आता मी कानला जाऊन आले म्हणजे अमुकच भूमिका करणार असं नाही. मला काम करण्यात मजा आली पाहिजे एवढंच.”

Published By- Priya Dixit