मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (15:52 IST)

'प्लॅनेट मराठी' या पहिल्या वाहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची सुरुवात

जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याच्या आणि आपली मराठी कलाकृती, संस्कृती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने काही महिन्यांपूर्वी 'प्लॅनेट मराठी' या पहिल्या वाहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा करण्यात आली होती. खरंतर तेव्हपासून 'प्लॅनेट मराठी'विषयी उत्सुकता होती. अखेर या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला असून 'प्लॅनेट मराठी'च्या कार्यालयाचा भव्य शुभारंभ सोहळा आज दिमाखात साजरा करण्यात आला. त्यामुळे आता लवकरच 'प्लॅनेट मराठी' प्रेक्षकांच्या भेटीस दाखल होणार आहे.
 
या सोहळ्याला सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेते सचिन पिळगावकर, मृणाल कुलकर्णी, अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, स्वप्नील जोशी, श्रुती मराठे, सायली संजीव, गायत्री दातार, गौरव घाटणेकर, नेहा पेंडसे, मनवा नाईक, स्वप्ना वाघमारे- जोशी, सोनाली खरे, आदिनाथ कोठारे, सुव्रत जोशी, शिवानी बावकर, आरोह वेलणकर, सुभाष देसाई, स्वप्नील गोडबोले, अमित फाळके आदी मान्यवर उपस्थित होते.
 
सुरुवातीपासूनच 'प्लॅनेट मराठी'सोबत अनेक मोठी नावे जोडली गेली आहेत. मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज अमित भंडारी, ऑस्कर ज्युरी उज्वल निरगुडकर, इतकेच नाही सिंगापूरमधील व्हिस्टास मीडिया कॅपिटल या मनोरंजन कंपनीनेही 'प्लॅनेट मराठी'सोबत काम करण्याची तयारी दाखवली आहे. पुष्कर श्रोत्री आणि आदित्य ओक यांची भागीदारी असणाऱ्या या 'प्लॅनेट मराठी'चे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर आहेत. आपल्या या संकल्पनेविषयी अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''देशातील तसेच परदेशातील मराठी प्रेक्षक 'मराठी चित्रपटांच्या 'फर्स्ट डे फर्स्ट शो'चा अनुभव घरबसल्या घेऊ शकतील. मराठी आशयाला योग्य स्थान मिळवून देण्यासाठी 'प्लॅनेट मराठी'चा कायम प्रयत्न असेल. आज आमच्या या कुटुंबात अनेक दिग्गज आहेत, ज्यांच्यामुळे आमचे हे कुटुंब अधिक सक्षम होईल आणि त्यांच्या मदतीने आम्ही उत्कृष्ट असा आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू.''