मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 18 मार्च 2020 (12:10 IST)

क्रिकेटपटूला कोरोना व्हायरसची लागण

कोरोना व्हायरसने आता क्रिकेटच्या मैदानावर प्रवेश केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एका परदेशी खेळाडूला कोरोना झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. यामुळे बोर्डाने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील प्लेऑफचे सामने रद्द केले आहेत. पाक बोर्डाने संबंधित खेळाडूचे नाव जाहीर केले नाही. पण मीडिया  रिपोर्टनुसार इंग्लंडचा क्रिकेटपटू अ‍ॅलेक्स हेल्स याला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. हेल्स कराची किंग्स संघाकडून खेळत होता. पीसीबीने स्पर्धा पुन्हा कधी होणार याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
 
सुपर लीग स्पर्धा खेळणार्‍या एका खेळाडूला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. पण संबंधित खेळाडू पाकिस्तानमधून मायदेशात गेल्याचे पीसीबीने म्हटले आहे. दरम्यान, माजी क्रिकेटपटू रमीज राजाने मंगळवारी दावा केला की स्पर्धा सोडून मायदेशात गेलेल्या हेल्समध्ये कोरोनाची लक्षणे आढळली होती.
 
ब्रिटिश माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार 31 वर्षी हेल्सला आसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. हेल्सला कोरोना झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर पाकिस्तान बोर्डाने संघातील सर्व खेळाडू, सपोर्टस्टाफ, अन्य  कर्मचारी यांची वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम आम्ही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय घेण्याचा निर्णय घेतला होता. पण सध्याच्या परिस्थितीत प्लेऑफचे सामने रद्द करण्याचा निर्णव योग्य ठरतो, असे पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी सांगितले.