शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 25 मे 2022 (09:52 IST)

Shikhar Dhawan:शिखर धवनने आयपीएलमध्ये एक खास विक्रम केला

आयपीएल 2022 च्या शेवटच्या साखळी सामन्यात पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून पराभव केला. यासह या स्पर्धेतील दोघांचा प्रवास संपुष्टात आला. हे दोन्ही संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले होते. त्यामुळे या सामन्याला विशेष महत्त्व नव्हते, पण पंजाब किंग्जचा सलामीवीर शिखर धवनने तो आपल्यासाठी खास करून घेतला. या सामन्यात धवनने आयपीएलचे 700 चौकार पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
 
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याच्या बाबतीत धवनच्या खालोखाल विराट कोहली आहे, ज्याने 576 चौकार मारले आहेत. त्याचबरोबर या यादीत डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 561 चौकार मारले आहेत. 
 
धवनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 32 चेंडूत 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन षटकार आणि दोन चौकार आले. शिखर धवनने आपल्या डावातील पहिले चार चौकार मारताच एक खास विक्रम केला. आयपीएलमध्ये 700 चौकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला.त्याच्या नावावर दोन शतके आणि 47 अर्धशतके आहेत. दरम्यान, त्याच्या बॅटने 701 चौकार आणि 136 षटकार मारले आहेत.
 
शिखर धवन आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने 6592 धावा केल्या आहेत, तर धवनने 6244 धावा केल्या आहेत. या दोन फलंदाजांशिवाय तिसऱ्या कोणत्याही फलंदाजाने आयपीएलमध्ये 6000 धावांचा टप्पा गाठलेला नाही.