रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By विकास शिरपूरकर|

माजी उपराष्‍ट्रपती भैरवसिंह शेखावत

PR
'राजस्‍थान का एकही सिंह- भैरोंसिंह भैरोंसिंह' या घोषणेने आपल्‍या असंख्‍य चाहत्यांच्‍या पाठिंब्यावर तीन वेळा राजस्‍थानच्‍या मुख्‍यमंत्रीपदावर विराजमान झालेले भैरवसिंह शेखावत हे राजस्‍थानातील भाजपचे तगडे नेते समजले जात होते. स्‍वातंत्र्य प्राप्‍तीनंतरच्‍या कॉंग्रेसच्‍या लाटेत या पक्षाला कडवी झुंज देणा-या या नेत्यामागे शेतकरी, ठाकूर, राजपूत, ब्राह्मण, शिख आणि जैन व मुस्लिम समुदायाचाही मोठा पाठिंबा होता.

तीन वेळा राजस्‍थानच्‍या मुख्‍यमंत्रीपदी राहिलेले आणि या भागातील ताकदवान ठाकूर नेते असलेल्‍या भैरवसिंह शेखावत यांचा जन्‍म 23 ऑक्टोबर 1923 ला तत्कालीन जयपूर संस्‍थानच्‍या खाचरियावास या गावात झाला. हे गाव आता सीकर जिल्‍ह्यात आहे. त्‍यांचे वडील देवी सिंह शेखावत आणि आईचे नाव माता श्रीमती बन्ने कँवर असे होते.

गावातील शाळेत आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्‍यानंतर त्‍यांनी हायस्‍कूलचे शिक्षण गावापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्‍या जोबनेर येथे पूर्ण केले. तर महाविद्यालयीन शिक्षण जयपूरच्‍या महाराजा कॉलेजमध्‍ये सुरू केले. मात्र त्या दरम्‍यानच वडीलांच्‍या निधनामुळे कुटुंबातील आठ जणांच्‍या पालन पोषणाची जबाबदारी त्यांच्‍यावर आली. त्‍यामुळे शिक्षण अर्ध्‍यावर टाकून ते शेतीच्‍या कामात गुंतले. नंतर त्यांनी काही दिवस पोलीस दलातही नोकरी केली. मात्र तेथे मन न लागल्‍याने त्यांनी पुन्‍हा शेती करण्‍यास सुरूवात केली.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लोकशाहीच्‍या स्थापनेमुळे सामान्‍य नागरिकांच्‍या अधिकारात भर पडली. या काळातच समाज आणि देशसेवीच्‍या वातावरणाने भारावलेल्‍या भैरवसिंह यांनी 1952 च्‍या पहिल्‍या विधानसभा निवडणुकीत भाग्य आजमावून पाहिले. यात ते विजयी होऊन पहिल्‍यांदा आमदार झाले. 1977 पर्यंत राजस्‍थानात कॉंग्रेसपक्षाची एक हाती वर्चस्‍व होते. या काळात कॉंग्रेसला कडवी झुंज देणा-या नेत्यांमध्‍ये शेखावत यांचा समावेश होतो.

शेखावत यांच्‍या लोकप्रियतेमुळे त्यांना अनेकदा वेगवेगळी आमीषे आणि प्रलोभने दाखवून कॉंग्रेसमध्‍ये सहभागी करून घेण्‍याचा प्रयत्न झाला. मात्र त्यांनी तो स्‍वीकारला नाही. 1967 च्‍या निवडणुकांमध्‍ये शेखावत यांच्‍या भारतीय जनसंघ आणि स्‍वतंत्र पक्षाच्‍या आघाडीला बहुमताच्‍या जवळपास जागा मिळाल्‍या मात्र तरी ही त्यांना सत्ता स्‍थापन करता आली नाही. मात्र आणिबाणीनंतरच्‍या निवडणुकांमध्‍ये जनता पार्टीच्‍या लाटेत शेखावत यांच्‍या नेतृत्वाखाली जनता पार्टीने 200 पैकी 151 जागांवर आपला विजय नोंदवत सत्ता स्‍थापन केली. त्यावेळी ते पहिल्‍यांदा मुख्‍यमंत्री बनले. 1980 च्‍या सुमारास जनता पार्टीत फुट पडल्‍यानंतर शेखावत भारतीय जनता पक्षात (भाजप) सहभागी झाले.

या वर्षी कॉंग्रेसने पुन्‍हा सत्ता हस्‍तगत केली. यानंतर बराच काळ त्यांना सत्तेपासून दूर रहावे लागले असले तरीही त्यांच्‍या नेतृत्व कौशल्‍याने त्यांनी पक्ष मजबूत केला. 1989 च्‍या निवडणुकीत त्यांनी पुन्‍हा उभारी घेतली. भाजप व जनता दलाच्‍या आघाडीने लोकसभेच्‍या 25 जागांवर तर विधानसभेच्‍या 140 जागांवर
विजय मिळवला. यावेळी शेखावत पुन्‍हा एकदा राजस्‍थानचे मुख्‍यमंत्री बनले. आघाडीत फूट पडल्‍याने यानंतरच्‍या निवडणुकीत शेखावत यांच्‍या नेतृत्वाखाली भाजप सर्वाधिक 96 जागा मिळवणारा पक्ष ठरला. तर भाजपच्‍या पाठिंब्यावर निवडणूक लढवलेले तीन अपक्षही येऊन मिळाल्‍याने हे संख्‍याबळ 99 वर गेले. यानंतर काही अपक्षांच्‍या पाठिंब्यावर 116 जागांवर शेखावत यांनी तिस-यांदा राजस्‍थानच्‍या मुख्‍यमंत्री पदाची शपथ घेतली.

नंतच्‍या 1998 च्‍या निवडणुकीत कांद्याचे दर वाढवल्‍याने नाराज झालेल्‍या जनतेच्‍या रोषाचा सामना शेखावत यांना करावा लागला आणि ते सत्तेपासून दूर गेले. मात्र त्यानंतर वर्षभरातच झालेल्‍या 1999 च्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपने आघाडी घेत 25 पैकी 16 जागांवर विजय मिळवला.

केंद्रात भाजप सरकार सत्तेवर असताना शेखावत यांनी उपराष्‍ट्रपदाची निवडणूक लढविली आणि 2002 मध्‍ये कॉंगेसच्‍या सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करून ते उपराष्‍ट्रपती म्हणून निवडून आले. आपल्‍या या कारकीर्दीत राज्यसभा सभापती म्हणून सर्वाधिक काळ प्रश्‍नोत्तरांचा तास व्यवस्थित पार पाडणारे कुशल सभापती म्हणून ते ओळखले जातात. ऐरवी प्रश्‍नोत्तराच्‍या तासात सर्वच प्रश्‍न पूर्ण होण्‍याचे प्रमाण फारच नगण्‍य आहे. मात्र शेखावत यांनी हे चित्र बदलून टाकले.

जुलै 2007 मध्‍ये त्यांनी राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीच्‍या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार म्हणून राष्‍ट्रपती पदाची निवडणूक लढवली. मात्र ते त्यात पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी उपराष्‍ट्रपतीपदाचाही राजीनामा दिला.

ते पुन्‍हा सक्रीय राजकारणात उतरणार असल्‍याची शक्यता अनेक जाणकारांनी यावेळी वर्तविली होती. तर राजस्‍थानच्‍या तत्कालीन मुख्‍यमंत्री वसुंधरा राजे यांचे पक्षातील राजकीय विरोधक म्हणूनही ते समोर आले. आपला वारस म्हणून आपल्‍या जावयाला स्‍थापित करण्‍याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र राजे यांना भापजचे ज्येष्‍ठ नेते लालकृष्‍ण अडवाणींचा पाठिंबा मिळत असल्‍याचे पाहून ते उघडपणे अडवाणींनाही विरोध करू लागले. 2009 मधील लोकसभा निवडणुकीत रालोआचे उमेदवार म्हणून अडवाणी यांचे नाव निश्चित होईपर्यंत आपणही पंतप्रधानपदाच्‍या उमेदवाराच्‍या शर्यतीत असल्‍याचा प्रचार करण्‍याचाही त्यांनी प्रयत्न केला. मात्र रालोआने अडवाणींना भावी पंतप्रधान म्हणून 'प्रोजेक्ट' केल्‍यानंतर ते अडवाणींच्‍या पाठिंब्यासाठी प्रचार करतही फिरले.

आपल्‍या आयुष्‍याच्‍या अखेरच्‍या काळात राजस्‍थानातील पक्षांतर्गत गटबाजीमुळे सक्रिय राजकारणापासून दूर गेलेल्‍या शेखावत यांचे प्रकृती अस्‍वाथ्‍यामुळे जयपूर येथील सवाई मानसिंह रुग्णालयात उपचारा दरम्यान 15 मे 2010 रोजी वयाच्‍या 87 व्‍यवर्षनिधन झाले.