शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

"ठप्पा"

"अडोप्टेशनच्या निम्म्याच काही औपचारिकता शिल्लक आहेत, त्यानंतर तुम्ही ह्यांना कायदेशीरपणे घरी घेवून जाऊ शकता." आश्रमचे संचालक म्हणाले.
 
"धन्यवाद! आज आपल्यामुळे माझं कुटुंब पूर्ण होणार आहे." आदित्यच्या भावना उचंबळून येत होत्या.
 
"धन्यवाद आपल्याला! जर आपल्यासारखे लोकं समाजात राहातील तर असल्या विसंगती हळूहळू नाहीशा होतील...लोकं एवढे कसे निर्दयी असू शकतात...की ह्यांना असे, येथे सोडून निघून जातात..देवंच जाणे.. ! 
हो आलो, आलो... " म्हणत संचालक आत निघून गेले.
 
आदित्य एक इंजिनिअर. अनाथाश्रमात वाढलेला एक होतकरू तरुण. शिष्यवृत्तीच्या आधारावर त्याने आपला अभ्यास पूर्ण केला. अनाथाश्रमाच्याच त्याच्या लहानपणाच्या मैत्रिणीसोबत त्याचं लग्न झालं. दोघांनी मेहनतीने, चिकाटीने छान सुखाचा संसार थाटला. सर्व सुखसोयी होत्या पण एक उणीव नेहमीच भासायची की लहानपणापासूनच वडीलमाणसांच्या प्रेमाची सावली मिळाली नाही. सर्वकाही असूनही "अनाथ" ह्या शब्दाचा एक ठप्पा लागला होता त्यांच्या नावासोबत. 
 
आणि आज, पितृदिनाच्या दिवशी, आदित्य वृद्धाश्रमातून कायदेशीररीत्या देशमुख काकांच्या सांभाळाचा संपूर्ण अधिकार घेऊन, त्यांना आपल्या घरी नेणार होता. "अनाथ" शब्दाचा ठप्पा पूर्णपणे पुसून टाकण्यासाठी.
 
©ऋचा दीपक कर्पे