1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 17 डिसेंबर 2020 (11:08 IST)

उंबरा असते एक मर्यादा

उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसविलेले जाड, रुंद आणि सपाट लाकूड. दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून रहाणारा वृक्ष म्हणजे उंबराचा वृक्ष. म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा उंबराच्या खोडापासून बनत असे. या वृक्षाच्या नावावरुनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचं नाव उंबरा असे पडले असावे. उंबराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे.
 
घरात शिरताना शुभ वृक्षाच्या लाकडाला ओलांडून प्रवेश केल्यास घरातील उर्जा कायम सकारात्मक राहिल, या हेतूने उंबराच्या वृक्षाचा वापर होत असावा, असाही कयास करता येईल. काही लोक याच उंब-याला उंबरठा असेही म्हणतात. उंब-यापाशी उभं राहून आपण येणा-या व्यक्तीची वाट बघतो. उंबरा ओलांडून एखाद्या भिक्षेक-याच्या झोळीत भिक्षा टाकतो. 
 
नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले माप लांघत घरात प्रवेशते. उंब-याला गृहित धरत आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो. घरातल्या उंब-याच्या खूप सा-या भूमिका असल्या तरीही उंबरा असते एक मर्यादा. उंबरा असते एक सीमारेषा. उंबरा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट. 
 
बाहेरुन घरात येणा-यांसाठी आपला इगो चपलांच्या सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजे उंबरा. प्रवेशत असलेल्या घरातल्या चालीरीतींना मान देत आपण वागायचं आहे हे उंब-याची वेस ओलांडतानाच मनात बिंबवून यायचं असतं. आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही, हे आपल्या लक्षात आणून देणारी जागा म्हणजे उंबरा. 
 
उंबरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान.उंब-याबाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही हे म्हणतात ते अगदी खरं आहे. उंबरठे झिजवल्या शिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा खरंच.पण उंबरठे झिजवताना आपल्यावर आपल्या उंब-याने केलेले संस्कार लक्षात ठेवले तर निसरड्या जागांचा सामना करणं सोपं होत असतं. अजून एक गोष्ट इथे नमूद करायलच हवी. ती म्हणजे - उंब-याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचं फार मोठं भान. हे भान जे कोणी जपतं त्याचं आयुष्यात नेहमीच सुंदर होत असतं. 
 
काल परवा गावातल्या एका भल्यामोठ्ठ्या वाड्यात शिरत असताना समोर औदुंबराचा पार दिसला आणि घराचा छानसा उंबरा नजरेस पडला म्हणून हे लिहिता आलं, इतकंच...
 
-सोशल मीडिया