गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By
Last Modified: शनिवार, 5 डिसेंबर 2015 (12:56 IST)

परतू : चित्रपट परीक्षण

अमेरिकन प्रॉडक्शन हाऊस ‘इस्ट वेस्ट फिल्म्स’ची ‘परतू’ ही निर्मिती आहे. पण तरीही ह्या फिल्मला अस्सल भारतीय मातीचा गंध आहे. नितीन अडसूळने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट फिल्मी वाटण्याजोग्या एका सत्यघटनेवर आधारित आहे. 1968 ला राजस्थानातल्या एका छोटय़ा गावातला एक लहान मुलगा पृथ्वी आपल्या आई-वडिलांकडे झगमगत्या मुंबईला एकदा जाऊन पाहण्याचा हट्ट धरतो. पहिल्यांदा विरोध करणारे आई-वडील बालहट्टापुढे नमतात. आणि मुंबईच्या काकासोबत त्याला काही दिवसांसाठी मुंबईला पाठवतात. पण मुंबईला काका-पुतण्याची स्टेशनवर ताटातूट होते. आणि मुलगा चुकून राजस्थानला जाणार्‍या ट्रेनऐवजी अहमदनगरच्या ट्रेनमध्ये चढतो. मराठी येत नसलेल्या, हरवलेल्या, भुकेल्या, घाबरलेल्या ह्या लहानग्याची गाठ नगरच्या एका शेतकर्‍याशी होते. तो त्याला घरी घेऊन जातो. खाऊ घालतो. आणि मायेची उब देतानाच त्याच्या आई-वडिलांचा शोध करतो. पण त्याच्या आईवडिलांशी त्याची गाठ घालायची धडपड 17 वर्षानी तो मुलगा मोठा होऊन, लग्न होऊन कर्ता-सवरता झाल्यावर होते. अतिशय भावुक करणारी ही कथा पडद्यावर जेव्हा उलगडत जाते. तेव्हा तुम्हीही चित्रपट पाहण्यात गढून जाता. किशोर कदम, स्मिता तांबे ह्यांच्या सशक्त अभिनयामुळे तर चित्रपटातला इमोशन तुमच्यापर्यंत परिणामकारकपणे पोहोचतो. किशोर आणि स्मिताला योग्य साथ दिलीय, ती, नवीन परिहार, सौरभ गोखले, नार सिंग, रवी भूषण ह्यांनी.