WD |
आयडियाची कल्पनामधील आपल्या भूमिकेबद्दल माहिती देताना अशोक सराफ यांनी सांगितले, या चित्रपटात मी वकील मनोहरची भूमिका साकारीत आहे. निर्मिती सावंत माझी पत्नी आहे आणि सचिन मेहुणा. कोर्टात केस लढण्यापेक्षा मला बाहेर सेटलमेंट करणे आवडत असते त्यामुळे मी माझ्या अशीलांना कोर्टाच्या बाहेर सेटलमेंटसाठी तयार करीत असतो. यात माझा स्वतःचाही स्वार्थ असतो कारण केस न लढता मला त्यातून चांगले पैसे मिळत असतात. एकदा सचिनला भेटायला मी जातो नेमके त्याचवेळेस एक कार येऊन त्याला ठोकते. सचिनला अपघात होताच मला त्यातून पैसे कमविण्याची कल्पना सुचते. मी कार मालकावर दोन लाखांचा दावा ठोकतो. कार एक मुलगी चालवत असते त्यामुळे तिला आरामात फसवून पैसे काढू असे मला वाटत असते. मात्र ती कार त्या मुलीची नसते तर तिच्या भावाची असते. आणि तिचा भाऊ पोलीस कमिशनर असतो. मात्र मी अगोदरच खटला दाखल केलेला असल्याने मला आता माघारही घेता येत नाही. पोलीस कमिशनर महेश ठाकुर खूपच डोकेबाज असतो आणि त्याला माझ्या कारवाया ठाऊक असतात. तो माझ्या सगळ्या क्लृप्त्या अयशस्वी करण्याचा प्रयत्न करतो. आमच्या दोघांच्या कुरघोडीमध्ये सचिन भरडला जातो. परंतु मी हार मानत नाही. शेवटी काय होते ते चित्रपट पाहिल्यावरच समजेल. मात्र मी एवढे अवश्य सांगू इच्छितो कि, सचिनने खूपच चांगल्या पद्धतीने चित्रपट तयार केला आहे. सचिन नेहमी प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा विचार करतो आणि त्यानुसार चित्रपट बनवतो. त्यामुळेच त्याचे चित्रपट प्रेक्षकांना आवडतात. त्याच्या अगोदरच्या चित्रपटांप्रमाणेच प्रेक्षकांना आमची ही आयडियाची कल्पनाही नक्कीच आवडेल.
सचिन आणि महेश यो दोघांबरोबर तुम्ही काम केलेले आहे. दोघांच्या दिग्दर्शनाच्या शैलीबद्दल काय सांगाल विचारता अशोक सराफ म्हणाले, दोघांची शैली वेगळी असली तरी दोघांचा उद्देश्य एकच आहे आणि तो म्हणजे प्रेक्षकांचे मनोरंजन. सचिन हा निखळ विनोदी, कौटुंबिक चित्रपट तयार करतो तर महेशच्या चित्रपटांमध्ये मनोरंजनाबरोबर थि्रलही असते. महेशचा चित्रपट थि्रलर एक्शन चित्रपट असतो तर सचिनचा विनोदी कौटुंबिक पट. दोघांनी आपली शैली चांगल्या पद्धतीने जपलेली आहे. मात्र असे असले तरी दोघे वेगळ्या विषयाツवरचे चित्रपटही उत्कृष्टरित्या दिग्दर्शित करतात. सचिनने अग्निपरीक्षा तर महेशने चिमणी पाखरं आणि शुभमंगल सावधानसारखे चित्रपटही केले आहेत. सचिन कॅरेक्टरराइजेशनवर खूप भर देतो. तो प्रत्येक भूमिका उत्कृष्टरित्या कागदावर साकारतो त्यामुळे ती पडद्यावर साकारताना खूपच मजा येते. महेशची काम करण्याची शैली वेगळी आहे. सचिनबरोबर मी शेवटचा चित्रपट आम्ही सातपुते केला होता तर महेशबरोबर माझा शेवटचा चित्रपट शुभमंगल सावधान होता. सचिनबरोबर मी १४ मराठी आणि ४ हिंदी चित्रपट केले आहेत. सचिनचे आणि माझे खूप जुने संबंध आहेत. त्याचे वडील म्हणत असत कि अशोक माझा मोठा मुलगा आणि सचिन छोटा. आजही त्यांच्या घरी मला मोठ्या भावाचाच मान दिला जातो.

WD
तुम्ही आजकाल खूप कमी चित्रपट का करता विचारता अशोक सराफ म्हणाले, मी केवळ करायचे म्हणून चित्रपट करीत नाही. पूर्वीपासूनच मी विचार करूनच चित्रपट करतो. आज माझ्या घरी स्क्रिप्टचा ढीग लागला आहे परंतु एकही अशी स्क्रिप्ट मला चांगली वाटली नाही, काही स्क्रिप्टची पहिली चार-पाच पाने वाचल्यावरच पुढे काय होणार हे लक्षात आले. हिंदीमध्येही मला विनोदी कलाकार म्हणूनच घेण्याचे प्रयत्न होतात. बरं घेतल्यावर माझ्यासाठी चांगले प्रसंगही लिहिलेले नसतात. सेटवर गेल्यावर मलाच सांगतात कि हे दृश्य तुम्हीच लिहा. त्यामुळे मी हिंदी चित्रपटही करीत नाही. मालिकांमध्येही चांगल्या भूमिका ऑफर झाल्या नाहीत. सारखं छातीत दुखतंय नाटकाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आता चांगले नाटकही मिळत नाही.
आगामी चित्रपटांबद्दल विचारता अशोक सराफ यांनी सांगितले, तुला खरे तर आश्चर्य वाटेल परंतु आता मी जे काही मराठी चित्रपट करीत आहे त्याचे निर्माते गैरमराठी आहेत. मनमोहन देसाईंचा मुलगा केतन देसाईचा नटसम्राट नावाचा एक चित्रपट मी करतोय, या चित्रपटाची कथा खूपच चांगली आहे. नाटक नटसम्राटशी याचा काही संबंध नाही. फक्त नाव नटसम्राट आहे परंतु संपूर्ण कथानक वेगळे आहे. अरुणा इरानी, दयाल निहलानी हेसुद्धा मला घेऊन मराठी चित्रपट तयार करीत आहेत.
दिग्दर्शक व्हावे असे वाटत नाही का विचारता अशोक सराफ म्हणाले, मला अशी स्क्रिप्टच सापडलेली नाही जी वाचल्यावर मला वाटावे की याचे दिग्दर्शन मी करावे. अनेकांनी मला सांगितले की दिग्दर्शक हो परंतु दिग्दर्शक होणे साधी गोष्ट नाही. दिग्दर्शन हे पूर्ण वेळचे काम आहे. दुसरी गोष्ट अशी की मी दिग्दर्शन करायला सुरुवात केली की सगळे म्हणणार अशोक सराफ आता दिग्दर्शक झाले ते आपल्या चित्रपटात काम कसे करतील आणि मला घेणार नाहीत. ही गोष्ट मला टाळायची आहे.