शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 जून 2015 (14:42 IST)

ज्योतिषी संस्कार कथा

ग्रीकमधील ही गोष्ट आहे. कदाचित दंतकथा असेल, पण त्यात सत्याचा अंश आहे. अंधविश्‍वासू लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. ग्रीकमध्ये खूप नावाजलेला एक मोठा ज्योतिषी होता. एके दिवशी सायंकाळी तो कुठेतरी जायला निघाला. तो चालत असतानाच सूर्य अस्ताला गेला. आकाशाकडे बघत चालू लागला. आकाशातील तारे बघता बघता तो एका खड्डय़ात पडला. आकाशातील तार्‍यांकडे ज्याची नजर स्थिर झाली आहे त्याला जमिनीवर खड्डा कसा दिसणार? शक्यच नाही. दोन्ही एकाच वेळी शक्यच नाही. तो ज्योतिषी त्या खड्डय़ात पडला. त्याला खूप मुकामार लागला. अनवधानाने तो खड्डय़ात पडल्याने तो जबर ठेचला गेला होता. ओरडू लागला. कण्हू लागला. त्याच्याने उठवेना. जवळच एक झोपडी होती. एक म्हातारी तिथे राहत असे. तिला तो आवाज ऐकू आला. म्हातारी दिवा घेऊन आली. खड्डय़ात पडलेल्या त्या ज्योतिषाला तिने मोठय़ा मुश्किलीने मदत करीत बाहेर काढले.

खड्डय़ाच्या बाहेर येताच तो ज्योतिषी म्हातारीला म्हणाला, 'आजीबाई मी कोण आहे हे तुला कदाचित ठाऊक नसेल? मी एक फार मोठा ज्योतिषी आहे. आकाशातील तार्‍यांसंबंधी पृथ्वीवरील कोणाही व्यक्तीपेक्षा मला अधिक माहिती आहे. आकाशातील तार्‍यांविषयी तुला काही माहिती हवी असेल तर माझ्याकडे ये. 
पुष्कळ लोक येतात. मला हजारो रुपये फी देतात. तुझ्याकडून मात्र मी काहीही घेणार नाही.' म्हातारी म्हणाली, 'मुला, तू काळजी करू नकोस. मी कधीही येणार नाही. अरे ज्याला अजून जमिनीवरील खड्डा दिसत नाही. त्याच्या आकाशातील तार्‍यांच्या ज्ञानाचा काय विश्‍वास ठेवायचा? अरे, तुला जवळचं दिसत नाही तर दूरवरचं कसं दिसेल? जवळच्या दिसण्यात जर तू इतका आंधळा आहेस.. तर दूरवरच्या तुझ्या ज्ञानाचा कसा बरे विश्‍वास ठेवावा?' निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी निरक्षर होत्या. पण ग्रीकमधल्या म्हातारीसारख्याच शहाण्या होत्या. अंधविश्‍वासू नव्हत्या. वयाच्या तिसाव्या वर्षीच त्या विधवा झाल्या. तेव्हा घरासमोर ज्योतिषी येऊन त्याचं अंध:कारमय भविष्य सांगू लागला. तेव्हा त्याला त्या म्हणाल्या होत्या -
 
'नको नको रे ज्योतिषा, नको हात माझा पाहू
 
माझं दैव माले कये, माझ्या दारी नको येऊ!'
 
तात्पर्य : जे प्रत्यक्ष दिसते त्यावरच विश्‍वास ठेवावा.