गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By वेबदुनिया|

'प्रेम' करणे, एक कला

'प्रेम' करणे ही एक कला आहे. ही कला कुठल्या शाळेत अथवा कॉलेजात शिकवली जात नाही. ती अनुभवाने शिकावी लागते. स्वत:च्या नसल्या तरी इतराच्या अनुभवातून ही कला शिकली पाहिजे. कधी बागेत एकमेकांमध्ये गुंतलेल्या किंवा रम्य अशा कातरवेळी समुद्राच्या वाळूवर फिरणार्‍या 'प्रेमी कपल'कडून अप्रत्यक्षरित्या ती कला आपण आत्मसात करावी लागते. पण प्रत्येकाला ते जमतेच असे नाही. म्हणूनच आपल्यासाठी प्रेम करण्याच्या कलेच्या काही टिप्स....

मॉडर्न स्टाईल - 'मॉडर्न स्टाइल'चा अर्थ आपण ज्या वर्तमान काळात जगत आहेत ते जग. हे जग पूर्णपणे 'फॅशनेबल' झाले आहे. या फॅशनेबल जगाचे तुम्हीही एक घटक आहात. तुम्ही असे व्हा की, तुमच्याकडून इतरांनी काही शिकले पाहिजे. तारूण्याच्या उंबरठ्यावर वाटचाल करत असताना त्या दिशेने विचार करण्याची परिपक्वता आपल्यात आली पाहिजे. सगळ्यात आधी तर आपल्या डोळ्यावर काजळी चढलेले काल्पनिक चश्मे उतरवून जगाकडे पाहिले पाहिजे. कारण काळ्या चश्म्यातून काळेच दिसेल ना...! आजची तरूणाई जगण्याची कुठली कला वापरते ते पाहून आपला लूक बदलवणे ही काळाची गरज बनली आहे.

डोळ्यांची भाषा - ज्याप्रमाणे देहबोली आहे. तशीच डोळ्यांची भाषा आहे. डोळ्यांमध्ये पाहिल्याने आपल्याला सगळं कळते. मात्र, ती भाषा समजता आली पाहिजे. डोळ्याची भाषा समजण्यासाठी अतिशय सतर्क राहावे लागते. कारण, डोळे देखील द्विअर्थी बोलतात. काहीच्या डोळ्यात संथ, शांत सागर दिसतो तर काहीच्या डोळ्यात भविष्याच्या वादळाची चाहूल दिसते. त्यासाठी डोळे वाचायला शिका. तुम्ही कुणाच्या डोळ्यातले निस्वार्थ प्रेम ओळखले असेल, तर 'आँखों ही आँखों में 'प्यार' हो जाता है.

पहिली भेट - एकुणात या प्रकरणात 'पहिली भेट' ही फार महत्त्वाची असते. त्या दिशेने पडणारे प्रत्येक पाऊल महत्त्वाचे व काळजीपूर्वक पडले पाहिजे. कोण कुठल्या हेतूने आले आहे, हे आपण ओळखले पाहिजे. परिस्थितीचा अभ्यास केले पाहिजे. ती भेटायला येते म्हणून अधिक उत्साह ही क्षणात आपला भ्रमनिरास करू शकतो. त्यासाठी आधी जाणून घ्या की, 'तिची' किंवा 'त्याची' काय इच्छा आहे.

प्रेम व्यक्त कण्याची वेळ - 'प्रेम' कधी व्यक्त करायचे याचे देखील मानसशास्त्र आहे. प्रेम अशा वेळी व्यक्त केले पाहिजे की, 'आग दोनों तरफ बराबर है...!' कधी काळी अशी वेळ येते की, प्रेम व्यक्त करण्याची आवश्यकताच भासत नाही. 'प्रेम' व्यक्त करण्यासाठी स्थळ, वेळ व परिस्थितीचे भान ठेवणे अधिक महत्त्वाचे असते. थोडे प्रेमाने...थोडे ब्रेक के बाद... अशी थोडी गंमत करून प्रेम व्यक्त करण्यात जी मज्जा आहे, ती डायरेक्ट 'आय लव्ह यू' म्हणण्यात नाही. तुमचा प्रेम व्यक्त करण्याचा 'अंदाज' तिलाही खूप आनंद देऊन जाईल. 

 
डेटिंग - डेटिंगला एखाद्या पार्क अथवा चांगल्याशा रेस्टॉरन्टमध्ये बसा. डेटिंगला जाताना भडक कपडे परिधान करू नका. गप्पामध्ये इतके रमा की, सरळ 'प्रेमाच्या गावाला' निघा. फालतू व वायफळ जोक्स करू नका की, त्याने समोरचा बोअर होईल. यात वेळेच भान राखणे दोघांनाही गरजेचे आहे.

सरप्राईज गिफ्‍ट द्या - वाढदिवसची तारीख लक्षात ठेवून 'तिला' किंवा 'त्याला' सरप्राईज गिफ्ट द्या. आपण तिची किंवा त्याची किती काळजी घेतो. याची जाणीव करून द्या.

शब्द जपून वापरा- तिच्या किंवा त्याच्या बोलण्यात वाहून जाऊ नका आपण काय बोलतो आहे, यावर आपले जाणीवपूर्वक लक्ष पाहिजे. तुमच्या बोलण्यातला एखादा शब्द तुमच्यात दरी निर्माण करू शकतो.


भांडा पण प्रेमाने - प्रेमात भांडण नाही, ते प्रेमच नाही, असे म्हटले जाते. मात्र, त्या भांडणाचा शेवट प्रेमाने झाला पाहिजे. त्यासाठी एखाद्या दिवशी प्लॅनिंग करा. आणि भांडणाला निमित्त शोधा. तेव्हा बघा प्रेमाने भांडल्याचा आनंद किती वेगळा असतो. मात्र, तुम्ही करत असलेली गंमत मनाला लावून घेणार नाही, याची काळजी घ्या. 

प्रत्येक गोष्टीचा शेवट हा गोड झाला पाहिजे. भारतीय चित्रपटाची सुरवात ही हिरो- हिरोईनच्या प्रेमाने होते. आणि शेवट त्यांच्या विवाहाने होतो. मात्र, तुमच्या प्रेमाला कोणी 'फिल्मी' म्हणायला नको, म्हणून तुम्ही जर अरेंज मॅरेज करणार असाल तर आधी 'लग्नाच्या बेडीत' अडका आणि मग प्रेमाच्या गावाचा रस्ता धरायला मोकळे व्हा...!