गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By wd|
Last Modified: बंगळुरू , शनिवार, 23 ऑगस्ट 2014 (11:35 IST)

‘ज्ञानपीठ’ विजेते अनंतमूर्ती कालवश

आपल्या साहित्यातील प्रतिभासृष्टीने जीवनातील वास्तवाचे दर्शन घडवणारे आणि आपल्या परखड मतांमुळे प्रसंगी रोष ओढवून घेणारे ज्येष्ठ साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 82 वर्षाचे होते. साहित्यातील अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
 
मूत्रपिंडातील विकारामुळे अनंतमूर्ती यांना बंगळुरू येथील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण काल दुपारी त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले. पण अखेर संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
 
अनंतमूर्ती यांचा जन्म 21 डिसेंबर 1931 रोजी कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात झाला. 1970 साली म्हैसूर विद्यापीठातील इंग्रजी विभागाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली. 1987 मध्ये ते केरळ विद्यापीठाचे कुलगुरू झाले. 1993 मध्ये ते साहित्य अकादमीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्यांना ‘एफटीआय’चे (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया) दोन वेळा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला.
 
त्यांच्या साहित्याची भाषा कन्नड असली तरी, विचार हे भाषेच्या पलीकडले होते. म्हणूनच त्यांच्या अनेक साहित्यकृतींची मराठीसह जगभरातील विविध भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना 1994 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1998 मध्ये केंद्र सरकारने त्यांचा पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला.
 
‘लेखकाने फक्त लोकप्रियतेची कास न धरता, प्रसंगी समाजाला न आवडणारे सत्यही परखडपणे सांगितले पाहिजे हे तत्त्वज्ञान ते जगले. मातृभाषा टिकवायची असेल तर किमान शालेय शिक्षण तरी मातृभाषेत घ्या. अन्यथा ती भाषा केवळ स्वयंपाकघरातील भाषा बनून जाईल, असे त्यांचे विधान प्रचंड गाजले होते.