शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By वेबदुनिया|

अंबाजी येथील अंबा माता

या देवीसर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै-नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः...

WDWD
गुजरातमधील धार्मिक स्थळांमध्ये अंबा देवीचे स्थान प्रमुख आहे. उत्तर गुजरातमध्ये अहमदाबादपासून १८० किलोमीटरवर अंबाजी या गावात या देवाचे स्थान आहे. या देवीला आरासुरी असेही म्हणतात. आरासुरी म्हणजे डोंगरावर असलेली देवी. हे मंदिर खूप प्राचीन आहे. त्याच्या गर्भगृहात प्रत्यक्षात देवीची मूर्ती नाही. तेथे देवीचे आसन आहे. त्यावर देवीचे दागदागिने आणि वस्त्रे अशा पद्धतीने ठेवली आहेत, की ते पाहून असे वाटते, देवीच तेथे बसली आहे. येथे देवी रोज वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते, अशी श्रद्धा आहे.

गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर पालनपूरपासून ६५ किलोमीटवरवर आणि माऊंट अबूपासून ४५ किलोमीटरवर अंबाजी हे गाव आहे. येथेच अंबामातेचे हे मंदिर आहे. गुजरातमधील बड्या मंदिरात याचा समावेश होता. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात भाविक भेट देत असल्यामुळे राज्यातील श्रीमंत मंदिरापैकी हे एक आहे. अंबेचे मूळ स्थान मात्र या मंदिरापासून तीन किलोमीटरवर असलेल्या गब्बर नावाच्या डोंगरावर आहे. देवीच्या ५१ शक्तीपीठांपैकी एक असलेल्या या ठिकाणी दुर्गामातेचे ह्रदय पडले होते, असे मानले जाते.

WDWD
गब्बर येथील अंबेचे मंदिर प्राचीन आहे. आर्यांच्या अस्तित्वापूर्वीपासून अंबामातेची पूजा केली जाते असे मानले जाते. आर्यांनी ही देवी स्वीकारून तिची आराधना पुढे सुरू ठेवली. गब्बर डोंगरावर असलेली पदचिन्हे व रथाच्या चाकाचीही चिन्हे मातेचीच आहेत, अशी श्रद्धा आहे. येथेच श्रीकृष्णाचे मुंडन करण्यात आल्याचे सांगितले जाते. येथे सुवर्ण यंत्र कोरण्यात आले असून त्यात ५१ श्लोक आहेत.

WDWD
आदिशक्ती अंबामातेचे हे मदिर देवीच्या ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. हिंदू धर्मात बारा शक्तीपीठे मानली जातात. उज्जैनचे भगवती महाकाली महाशक्ती मंदिर, कांचीपुरमचे कामाक्षी मंदिर, मलयगिरीचे ब्रह्मारंब मंदिर, कन्याकुमारीचे कुमारिका मंदिर, अमर्त गुजरात येथील अंबाजी मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, प्रयागचे देवी ललिता मंदिर, विध्य पर्वतातील विंध्यवासिनी मातेचे मंदिर, वाराणसी येथी विशालाक्षी मंदिर, गया येथील मंगलावती आणि बंगाल येथली सुंदर भवानी व नेपाळमधील गुह्यकेसरी मंदिर यांचा यात समावेश आहे.

रूक्मिणी व कृष्णाची मूर्ती हेही या स्थळाचे एक आकर्षण आहे. अंबाजी हे मध, मेण आणि लाकडाच्या व्यवसायासाठीही प्रसिद्ध आहे. अंबाजीजवळच संगमरवराच्या खाणीही आहेत. तांबे व अन्य खनिजेही येथे मिळतात.

WDWD
हजारो वर्षांपासून भाद्रपदातील पौर्णिमेला लोक अंबा मातेच्या दर्शनाला येत असतात. माता भक्तांची मनोकामना पूर्ण करते असे मानले जाते. याशिवाय प्रत्येक पौर्णिमेला येथे लोक मेलो नावाची प्रसिद्ध यात्रा भरते. देशाच्या कानाकोपर्‍यातून लोक दर्शनासाठी येथे येत असतात.

विशेष आकर्षण- नवरात्रात भाविकांची येथील मंदिरात गर्दी असते. संपूर्ण गुजरात तसेच बाहेरच्या राज्यातूनही लोक येथे दर्शनासाठी येत असतात. या काळात येथे भवई व गरबा या नृत्यांचा कार्यक्रम आयोजित केला जातो. सप्तशतीचा पाठही या काळात होतो. भाद्रपद पौर्णिमेला भाविक गब्बर डोंगरावर जाऊन तेथील देवीचे दर्शन घेतात.

कसे जाल-
अहमदाबादहून 180 किलोमीटर
माउंट अबूहून45 किलोमीटर
दिल्लीहून 700 किलोमीटर
जवळचे स्टेशन- अबू रोड
जवळचे विमानतळ- अहमदाबाद