Last Updated:
सोमवार, 10 ऑगस्ट 2015 (15:51 IST)
इंदूर शहराला फार मोठा इतिहास आहे. या संस्थानाचे संस्थापक मल्हारराव होळकर (१६९४ ते १७६६) यांनी आपल्या मामाच्या मदतीने पेशव्यांच्या सन्यात प्रवेश केला. इंदूर हे मध्य प्रदेशातील एक मोठे संस्थान. इंदूर म्हटले की, मराठी इतिहासांतील कितीतरी जुन्या आठवणी जाग्या होतात. इंदूर हे नाव इंद्रेश्वर मंदिरावरून पडलेले आहे. हे मंदिर
१७ व्या शतकातील आहे. सरदार मल्हाराव होळकर, अहिल्याबाई यांच्यामुळे इंदूर महाराष्ट्राला जवळचे वाटते. भौगौलिकृष्टयाही इंदूर महाराष्ट्राला जवळ आहे. इंदूरच्या उत्तरेला ग्वाल्हेर, पूर्वेला देवास व भोपाळ, दक्षिणेला पूर्वीचा मुंबई इलाखा आणि पश्चिमेला बडवानी व धार ही शहरं आहेत.
त्याने पेशव्यांकडून मनसब, माळव्याची जहांगीर व नर्मदेच्या उत्तरेकडील मराठयांच्या हालचालींचं सेनापतीपद हे अधिकार क्रमाक्रमाने मिळवलं. त्याच्या हयातीतच त्याचा मुलगा खंडेराव मृत्यू पावल्याने खंडेरावाचा मुलगा मालेराव यास गादीवर बसवण्यात आलं. तथापि मालेरावाच्या अकाली निधनामुळे खंडेराव यांच्या पत्नी अहिल्याबाई यांनी १७५४ ते१७९५ पर्यंत इंदूर संस्थानाची जबाबदारी सांभाळली. धार्मिकता, औदार्य, देवळांचे जीर्णोद्धार, न्याय व राज्यकारभाराची उत्तम व्यवस्था यासाठी अहिल्याबाई इतिहासात प्रसिद्ध झाल्या. अहिल्याबाईंनीच इंदूर शहराची भरभराट केली. २० एप्रिल १९४८ रोजी हे संस्थान मध्य भारत संघात विलीन झाले.
भोपाळ ही मध्य प्रदेशची प्रशासकीय राजधानी असली तरी सांस्कृतिक राजधानी आहे ती इंदूर. स्थानिक भाषेत इंदौर. मुंबई-पुण्याहून १४ तासांचा ट्रेनचा प्रवास करून इंदूर गाठता येते, तर औरंगाबाद, जळगाव येथून रात्रभराच्या बसच्या प्रवासानंतर आपण इंदूरला पोहोचतो. मुंबई-पुण्याहून इथं विमानसेवाही आहे. इंदूरचा विमानतळ हा भारतातला एकमेव असा विमानतळ असावा, की जिथून मुख्य शहर फक्त १५ मिनिटांच्या अंतरावर आहे.
मुंबईहून संध्याकाळी अवंतिका एक्स्प्रेसमध्ये बसायचं, सकाळी येणा-या स्थानकांवर खास ताजे इंदुरी पोहे खायचे की साडेनऊच्या आत आपण इंदूरला पोहोचलेले असतो. ट्रेन शिवाय आता बससेवाही सुरू झाली आहे.
इंदूरची खाद्यसंस्कृती तर प्रसिद्ध आहे. इथले लोक खाण्यासाठी जगतात, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इंदूरच्या खवय्येपणाचे किस्से सर्वदूर पसरले आहेत आणि त्यात कणभरही अतिशयोक्ती नाही, हे इथे आल्या आल्या कळतं. त्याचबरोबर खाणं हे वेळेला बांधील नाही, त्यामुळे खायचं केव्हा हा प्रश्न पडायचं कारण नाही. इंदुरी लोकांचा दिवस सुरू होतो (आणि संपतोही) तो पोहे आणि जिलबीने. जिथे जाल तिथे पोहे दिसतात. केव्हाही गेलात तरी गरम पोहे मिळतात. या पोह्यावर विविध प्रकारची शेव, मसाला घालून ते दिले जातात. काही ठिकाणी जिलेबीही मिळते. सकाळी नाष्टा म्हणजे पोहे, हे इथं समीकरण आहे. एवढया प्रचंड प्रमाणात पोहे खपणारं हे भारतातील एकमेव शहर असावं. या विधानात कणभरही अतिशयोक्ती नाही.
इंदूरमध्ये आलात आणि बडा सराफ्याला गेला नाहीत तर तुम्ही इंदूर पाहिलंच नाही, असं म्हटलं जातं. कारण सराफा हा इंदूरच्या खाद्यसंस्कृतीचं जिवंत प्रतीक आहे. इथं ‘जिवंत’ या शब्दाला फार अर्थ आहे. इंदूर शहराच्या मधोमध होळकरांचा जो राजवाडा आहे त्याच्या मागच्या भागात अतिशय दाटीवाटीने असलेली दुकानं आहेत. यात कपडे, सराफांची दुकानं अर्थातच जास्त आहेत. थोडं पुढे गेल्यास सराफ बाजारच लागतो. या बाजारालाच सराफा म्हणतात. पण हा सराफा सोन्यापेक्षाही तेथील खाद्यसंस्कृतीसाठीच जास्त प्रसिद्ध आहे.
सराफी दुकानं बंद झाली की, रात्री साडेनऊनंतर विविध खाद्यपदार्थाची दुकानं लागण्यास सुरुवात होते. ही दुकानं रात्रभर उघडी असतात. तिथली स्पेशालिटी असलेले गराडू, साबुदाणा खिचडी, कचोरी, दहीवडा, गुलाब जाम, गोलगप्पा अशी यादी न संपणारी आहे. पोटात जेवढी जागा असेल आणि विविध चवी घेण्याची जिभेची तयारी असेल तेवढे विलक्षण चवींचे पदार्थ इथं मिळतात. या भागात रात्रभर चहलपहल असते आणि ही काही यात्रेतल्यासारखी एका रात्रीची दुकानं नसतात, तर वर्षातील ३६५ दिवस हे चित्र असंच असतं. सराफा कधीही झोपत नाही. छप्पन भोग नावाच्या एका भागात मिठायांची दुकाने आहेत.
पुढील पानावर बघा इंदूरचे प्रेक्षणीय स्थळे