अनेकांना झाडं लावायची हौस तर असते पण जागाच नसते. तर काहींना खूप जागा असूनही त्या जागेत काय लावावं हेच सुचत नाही. तर अनेकांना लावलेल्या झाडांना वाढवणं जमत नाही. पण झाड म्हणजे असा जीव आहे जो अगदी सहज वाढतो. त्यासाठी खूप श्रम करायची किंवा वेळ द्यायची गरज नाही. आपल्या जागेचा विचार करून झाड लावून येता-जाता, आपली कामं करता-करता त्यांच्याकडे लक्ष देता येतं. दिवसभराच्या धावपळीतून विरंगुळा म्हणून झाडांमध्ये मन रमवून त्यांची थोडी काळजी घेता येते. प्रेमाच्या, आपलेपणाच्या थोड्याशा शिडकाव्यानं झाडं बहरतात, आपलं अंगण फुलवतात आणि कोणाला तरी जगवण्याचा आनंद ते आपल्या ओंजळीत टाकतात.
				  													
						
																							
									  
	 
	१)बर्याच लोकांना भीती असते की, आपल्या अंगणात झाडं लावली तर त्यांची मुळं घराच्या भिंतींना कमजोर करतील. मग त्यावर अत्यंत सोपा उपाय आहे. जर जागा कमी असेल तर फक्त अशीच झाडं लावा ज्यांची मुळं खोलवर जातील; पण इकडे-तिकडे पसरणार नाहीत. उदाहरणार्थ- अशोकाचं झाड.
				  				  
	२) लावलेल्या झाडांना नियमित पाणी घालणं शक्य होत नसेल, तर जिथं आपण झाडं लावली आहे तिथं चूळ भरावी, नुसत्या पाण्यानं हात धुताना झाडांच्या कुंडीत धुवावे, चेहर्यावर पाणी मारताना झाडाच्या ठिकाणी जाऊन पाणी मारलं तर आपलंही काम होतं आणि झाडालाही पाणी मिळतं.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	३)पिण्याचे पाणी भरण्यापूर्वी बरेच जण आदल्या दिवशी भरलेल्या पाण्याला शिळं झालं म्हणून फेकून देतात. मग तेच पाणी आपण झाडांना घातलं, तर झाडांना वेगळं पाणी घालण्याची गरजच उरणार नाही.
				  																								
											
									  
	४) ज्यांच्या घरासमोर झाड लावण्यासाठी थोडीही जागा नाही त्यांनी खिडकीत कुंडीमध्ये जाई, गुलाब यासारखी झाडं आणि वेली लावावीत आणि घराच्या सोयीप्रमाणे या वेली त्यांना घरावर चढवताही येतील.
				  																	
									  
	५) फुलझाडं लावताना ती प्रखर उन्हात किंवा अगदी सावलीत लावू नये. ती अशा ठिकाणी लावावीत ज्या ठिकाणी सकाळचे कोवळे किरण त्यांना मिळतील व दुपारच्या उन्हाच्या झळाही त्यांना लागणार नाहीत.
				  																	
									  
	६) कुंडीत लावलेल्या आपल्या फुलझाडांना किंवा वेलींना आपण खूप जपतो; पण उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुट्टीत आपण बाहेर जातो तेव्हा ती झाडे-वेली पोरकीच होतात. त्यामुळे विश्वासू शेजार्याला रोज पाणी घालण्याची विनंती करून जाता येईल, अथवा पाणीसाठवणीच्या भांड्यातून सलाईनच्या छोट्या पाइपद्वारे कुंडीमध्ये ठिबक सिंचनाची व्यवस्था करता येईल. थेंबाचे प्रमाण खूप मंद ठेवावे. ज्यामुळे झाडांच्या कुंडीतला मातीचा ओलावा कायम राहील.
				  																	
									  
	७) झाडाची वाढ झाली की फांद्या घराच्या खिडक्यांची काचाही फोडतात. त्याचप्रमाणे फुलझाडेही वेडीवाकडी व कुरूप दिसू लागतात. त्यासाठी झाडांची वेळोवेळी छाटणी करणं आवश्यक असतं. छाटणीमुळे झाड चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होते.
				  																	
									  
	८) झाडांवर रोग पसरू नये म्हणून झाडावर अधूनमधून औषधफवारणी करावी.
	९) जागा किती आहे हे पाहूनच कोणते झाड लावावं हे ठरवावं, नाहीतर कमी जागेत मोठी किंवा खूप झाडे लावली तर त्यांचे पोषण व्यवस्थित होऊ शकणार नाही.
				  																	
									  
	अशा प्रकारे थोडं नियोजन केलं, थोडी काळजी घेतली तर आपल्याला जीवदान देणार्या झाडांना सहज जगवता येतं.