गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By

माउलीची महत्ता

आताची पिढी भाग्यवंतच म्हटली पाहिजे. मातृदिन, पितृदिन यासारखे वार्षिकोत्सव आमच्यावेळी नव्हते. कारण प्रत्येक दिवस हा आमच्यासाठी मातृ-पितृदिन असे. शालेय अभ्यासक्रमांमधून, कथाकीर्तनांमधून, जात्यांवर गायल्या जाणार्‍या ओव्यांमधून वात्सल्यसिंधू, करुणामूर्ती, कर्तव्यकठोर माता आम्हाला भेटत गेल्या. त्यामुळे स्वत:च्या आणि इतरांच्याही मातांकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन निकोप होत गेला. मातेप्रती असणार्‍या कर्तव्याची जाणीव होत गेली. काळीआई, गोमाता, मातृभाषा आणि मातृभूमी याही जन्मदात्री इतक्याच वंदनीय असतात. कवी कौस्तुभ यशवंत यांची प्रेमस्वरुप आई ही प्रसिध्द कविता पूर्वी तोंडपाठ असाची. त्याचबरोबर चिलिया-चांगुणाची, राजपुत्राला वाचविण्यासाठी पोटचे पोर बळी देणार्‍या पन्नादाईची कथा ऐकताना मनाची कोण घालमेल होत होती. उच्च दर्जाच्या समाजव्यवस्थेत अशा माता निपजतात आणि अशा मातांमुळे समाजाला, राष्ट्राला प्रतिष्ठा प्राप्त होत असते. शिवराय घडवायचे असतील तर जिजाऊ जन्माला याव्या लागतात आणि शिवरायांच्या जन्मामुळे जिजाऊंना महामातृत्व लाभत असते. नेते-अभिनेते आणि क्रिकेटपटू ज्या समाजाचे आदर्श असतात त्या समाजात ना जिजाऊ जन्म घेतात ना शिवराय. आज नेमके काय बिघडले आहे याचा सर्वानीच गांभीर्याने विचार केला तर येत्या रविवारी साजरा होणारा जागतिक मातृदिन काही प्रमाणात सार्थकी लागेल.
 
सोमनाथ देशमाने, अहमदनगर