मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात ८३ शिवभोजन केंद्रामार्फत गरीब व गरजूंना शिवभोजन थाळीचे मोफत वाटप
ठाणे शिधावाटप क्षेत्रात 83 शिवभोजन केंद्रामार्फत गरीब व गरजूंना मे 2021 पर्यंत मध्ये एकूण 5,23,133 शिवभोजन थाळींचे वाटप करण्यात आले आहे. राज्यात एक जानेवारी 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये गरीब व गरजूंना व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे.या योजनेअतंर्गत शिवभोजन जेवणाची थाळी वितरित करण्यात येत आहे.
मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्राकरिता कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर सद्यस्थितीत एकुण 19,900 थाळी प्रतिदिन इतका इष्टांक मंजूर आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर ब्रेक द चेनच्या प्रक्रीये अंतर्गत दिनांक 06 एप्रिल 2021 पासून ग्राहकांना शिवभोजन पार्सल (Take Away) सुविधेव्दारे उपलब्ध करुन दिलेली आहे. दिनांक 15 एप्रिल ते 14 जून 2021 या कालावधीपर्यत शिवभोजन केंद्रामधून सकाळी 11 ते दुपारी 4 या कालावधीत शिवभोजन पार्सल सुविधा सुरु राहील.
सद्यस्थितीत मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात एकुण 83 शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. या शिवभोजन केंद्रातून माहे मे -2021 मध्ये एकुण 5,23,133(पाच लक्ष तेवीस हजार एकशे तेहतीस) इतक्या शिवभोजन थाळयांचे मोफत वितरण केल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात गरीब व गरजूंना व्यक्तींना दिलासा मिळालेला आहे. म्हणून गरीब व गरजूंना याव्दारे आवाहन करण्यात येते आहे की, त्यांनी त्यांच्या विभागात उपलब्ध असलेल्या शिवभोजन केंद्रामधून गर्दी न करता सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन तसेच मास्कचा वापर करुन मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई येथील नियंत्रक शिधावाटप व संचालक कैलास पगारे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे केले आहे.