गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 5 नोव्हेंबर 2022 (20:54 IST)

मुंबईतला गोखले पूल वाहतुकीसाठी बंद, दोन वर्ष सर्व प्रकारच्या वाहतुक बंद

bridge
मुंबईतील अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुनर्बांधणीसाठी हा पूल सोमवार 7 नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. पुनर्बांधणीसाठी हा पूल किमान दोन वर्ष सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूल बंद झाल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी वाहतुकीसाठी 6 पर्यायी मार्ग दिलेले आहेत. 
 
अंधेरी पूर्व गोखले पूलाची काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांनी पाहणी केली होती. मुंबई महापालिकेने नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीने गोखले पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे सांगत तो बंद करण्याची सूचना केली होती.
 
अंधेरी गोखले पूल बंद असल्याने 6 पर्यायी मार्ग मुंबई वाहतूक पोलिसांनी उपलब्ध करून दिले आहेत. खार सबवे (खार), मिलन सबवे उड्डाणपूल (सांताक्रूझ), कॅप्टन गोरे उड्डाणपूल विलेपार्ले उड्डाणपूल (विलेपार्ले), अंधेरी सबवे (अंधेरी), बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल (जोगेश्वरी), मृणालताई गोरे उड्डाणपूल (गोरेगाव) हे 6 मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
 
 जुलै 2018 मध्ये गोखले रोड पुलाचा एक भाग कोसळला होता. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुंबई महापालिकेने शहरातील पुलांच्या सुरक्षितेसाठी ऑडिट केले. आयआयटी-मुंबईद्वारे शहरातील पुलांचे ऑडिट करण्यात आले होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor