मनसुख हिरेन यांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. त्या गाडीची माहिती काढली असता ती मनसुख हिरेन यांची असल्याचे समजले. पण मुंब्रा रेतीबंदर या ठिकाणी मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला. यानंतर ठाणे पोलिसांनी त्यांनी कळवा खाडीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली असल्याची माहिती दिली. यानंतर मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणले कि, मनसुख हिरेन आत्महत्या करणं शक्य नसल्याचं सांगत पोलिसांनी चुकीची माहिती देऊ नये अशी विनंती केली आहे. हि प्रतिक्रिया देताना त्यांनी कांदिवली क्राइम ब्रांचमधील तावडे नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला आहे.
“मी आणि माझं कुटुंब असा विचारही करु शकत नव्हतं. आमची गाडी आठ दिवसांपूर्वी चोरी गेली होती. पोलीस जेव्हा कधी फोन करायचे माझे पती चौकशीसाठी जात होते. पोलीस तासनतास त्यांना बसवून ठेवायचे. त्यांना बोलावलं होतं, ते गेले होते पण परत आले नाही. १० वाजल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. कांदिवली क्राइम ब्रांचमधून तावडे म्हणून कोणाचा तरी फोन आला होता. ते गेल्यानंतर अर्ध्या तासात फोन बंद झाला. आम्ही रात्रभर वाट पाहिली. सकाळीपण काही पत्ता नसल्याने तक्रार दिली,” अशी प्रतिक्रिया विमल हिरेन यांनी दिली.
पोलिसांकडून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “पोलीस त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगत आहे. ते कधीच आत्महत्येचा विचार करु शकत नाहीत. त्यांच्याबद्दल ही अफवा पसरवली जात असून खूप चुकीचं आहे. याचा पूर्ण तपास झाला पाहिजे. आमच्या कुटुंबाला याचा खूप त्रास होत आहे”. असे सुद्धा विमल हिरेन म्हणाल्या.