शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 5 डिसेंबर 2021 (09:54 IST)

Omicron चा राज्यात शिरकाव ,कल्याण डोंबिवलीत आढळला पहिला रुग्ण, भारतातील रुग्णांची संख्या 4 वर

कर्नाटक, गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात हा रुग्ण राहत असून, तो दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईत आला आहे.
महाराष्ट्राच्या आरोग्य खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर 2021 रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे.
"हा तरुण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोव्हिड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. 24 नोव्हेंबर 2021 रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला. त्याला इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोव्हिड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे." अशी माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे.
या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 35 जणांचा शोध घेण्यात आला असून, हे सर्वजण कोव्हिड निगेटिव्ह आढळले आहेत.
याशिवाय या तरूणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केल्यानं त्या विमान प्रवासातील 25 सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली आहे. यापैकी सर्वजण कोव्हिड निगेटिव्ह आढळलेले आहेत. याशिवाय संपर्कात आलेल्या आणखी काहीजणांचा शोध घेण्यात येत आहे.