मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (08:16 IST)

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये परब आणि देशमुखांचा हात; परमबीर सिंग यांचा सनसनाटी दावा

Parab and Deshmukh's hand in the transfer of police officers; Sensational claim of Parambir Singh
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता बळावत चालली आहे. कारण मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ईडीला दिलेल्या जबाबात अनेक सनसनाटी दावे केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मला सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्याच्या सूचना केल्याचा दावा परमबीर सिंग यांनी ईडीकडे केलाय. त्याचबरोबर सचिन वाझेला सेवेत घेतल्यानंतर गुन्हे शाखेत महत्वाच्या पदावर नियुक्ती द्या असंही आपल्याला सांगण्यात आलं होतं, असं परमबीर सिंग यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलंय.
 
परमबीर सिंग ईडीला दिलेल्या जबाबात म्हणाले की, सीआययुमध्ये नियुक्ती दिल्यानंतर काही महत्वाच्या केसेस सचिन वाझेला सोपवण्यात आल्या. त्या केसेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार वाझेला देण्यात आल्या. टीआरपी घोटाळ्यातील अर्णब गोस्वामी यांचं प्रकरणही याचवेळी वाझेला सोपवण्यात आलं होतं, असंही सिंग यांनी म्हटलंय. त्याचबरोबर सचिन वाझे अनिल देशमुख यांना नियमित रिपोर्ट द्यायचा, त्यांना ब्रिफ करायचा. वाझेनं मला सांगितलं होतं की पुन्हा पोलीस दलात येण्यासाठी त्याच्याकडून अनिल देशमुख यांनी दोन कोटी मागितले होते, असा धक्कादायक खुलासाही परमबीर सिंग यांनी ईडीकडे केलाय.
 
इतकंच नाही तर, मला वारंवार सह्याद्री गेस्ट हाऊसला बोलावलं जायचं. तिथे अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्याकडून पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात यादी मला दाखवली जायची. मुंबईतल्या बदल्यांमध्ये अनिल परब आणि अनिल देशमुख यांचा हस्तक्षेप होता. मी जुलै २०२० मध्ये मुंबईतील डीसीपींच्या बदल्यांची ऑर्डर काढली होती. ती मला सीताराम कुंटे यांनी मागे घ्यायला लावली. त्यावेळी मला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज सीताराम कुंटे यांनी केला आणि उद्धव ठाकरे यांनी तो आदेश मागे घ्यायला लावला होता, असा दावाही परमबीर सिंग यांनी केलाय. त्यानंतर सीताराम कुंटे यांनी सूचना दिल्याप्रमाणे मी डीसीपींच्या बदल्यांचा आदेश मागे घेतला. कुंटे यांनी केलेला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आजही आपल्याकडे आहे. अनिल देशमुख यांचं हस्ताक्षर असलेल्या काही याद्या आजही माझ्याकडे आहेत, असा गौप्यस्फोटही सिंग यांनी ईडीला दिलेल्या जबाबात केलाय.