शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 (07:59 IST)

सैफी बुऱ्हानी ट्रस्टचा गृहनिर्माण प्रकल्प नागरी पुनरुत्थान घडविणारा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis
मुंबई:- स्मार्ट सिटींच्या उभारणीद्वारे लोकांचे जीवनमान उंचावण्यावर भर देण्यात येत असून मुंबईतील भेंडीबाजारसारख्या गजबजलेल्या भागात आकारास येत असलेला सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टचा (SBUT)गृहनिर्माण प्रकल्प नागरी पुनरुत्थान घडविणारा असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
भेंडी बाजार येथे सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टच्या गृहनिर्माण प्रकल्प सेक्टर 4 च्या भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दाऊदी बोहरा समुदायाचे जागतिक आध्यात्मिक नेते डॉ. सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन, आमदार अमीन पटेल व मान्यवरांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टचा हा गृहनिर्माण प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुंबईतील भेंडीबाजार हा भाग अतिशय दाट लोकवस्तीचा म्हणून ओळखला जातो. अशा गजबजलेल्या भागात हा प्रकल्प आकारास येत आहे हे नक्कीच कौतुकास्पद व पथदर्शी आहे. आपण सर्वजण परिवर्तनाबद्दल बोलतो पण हा प्रकल्प खऱ्या अर्थाने बदल घडविणारा ठरतो आहे. अनेक अडथळ्यांवर मात करत हा प्रकल्प उभा राहतो आहे. उत्थान हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे हे महत्वाचे. समाजाची श्रद्धा असेल तर काय घडू शकते, याचे आदर्श उदाहरण म्हणजे हा प्रकल्प असल्याचेही श्री. फडणवीस म्हणाले.
 
‘SBUT’ प्रकल्प महाराष्ट्रातील नागरी नूतनीकरण प्रकल्पांसाठी ब्लू प्रिंट
उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, मुंबईतील धारावीसारख्या गजबजलेल्या भागाचेही पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. ‘SBUT’ प्रकल्पाचा मुख्य उद्देश लोकांचे जीवनमान उंचावणे हा असून हा प्रकल्प महाराष्ट्रातील नागरी नूतनीकरण प्रकल्पांसाठी ब्लू प्रिंट ठरेल. नागरी पुनरुत्थान घडवून आणणारा हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प ठरेल. शासनाकडून या प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. हा प्रकल्प मुदतीत पूर्ण होईल. इथे जर बदल घडू शकत असेल तर संपूर्ण मुंबईत असे प्रकल्प नक्कीच उभे राहतील असा विश्वासही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
 
दाऊदी बोहरा समाजाचे आध्यात्मिक नेते सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन म्हणाले, सर्व नागरिक या परिसरात गुण्यागोविंदाने नांदत आहेत. या प्रकल्पामुळे या भागातील गरजू लोकांना
लाभ होणार आहे. स्मार्ट सिटीच्या उभारणीत हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
स्मार्ट सिटीकडे वाटचालीसाठी प्रकल्प पथदर्शी
सैफी बु-हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 18 मे 2016 रोजी झाले. भेंडी बाजारातील सुमारे 250 मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जागी रुंद रस्ते, आधुनिक पायाभूत सुविधा, अधिक मोकळ्या जागा आणि अतिशय दृश्यमान व्यावसायिक क्षेत्रांसह 17 नवीन टॉवर उभारले जाणार आहेत.
 
या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे उद्दिष्ट 3200 कुटुंबे आणि 1250 व्यवसायांचे पुनर्वसन करण्याचे आहे. छोट्या खोलीत राहणाऱ्या कुटुंबांना 375 ते 400 स्क्वेअर फुटांची सुसज्ज घरे, निरोगी, स्वच्छ सुरक्षित वातावरण, आणि मुलांना खेळण्यासाठी आणि शिकण्यासाठी पुरेशी जागा इथे उपलब्ध होत आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल हा या प्रकल्पाच्या उभारणीचा महत्त्वाचा उद्देश आहे. यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने आराखडा तयार करण्यात आला असून सर्व सोयी-सुविधांनी युक्त इमारती येथे बांधण्यात येत आहेत.
 
‘अन-नसर’ नावाच्या सेक्टर 4 मध्ये पुनर्विकासासाठी हाती घेतलेल्या एकूण 16.5 एकर जमिनीपैकी अंदाजे 1.5 एकर जागा समाविष्ट आहे.  An-Nasr मध्ये जवळपास 1400 निवासी युनिट्स आणि 375 पेक्षा जास्त व्यवसाय असतील.  74 मोडकळीस आलेल्या इमारतींमुळे प्रत्येकी 53 आणि 54 मजल्यांचे दोन नवीन टॉवर उभारले जाणार आहेत.
 
या प्रकल्पाद्वारे हाती घेतलेले पुनर्विकास क्षेत्र उत्तम व्यवस्थापन आणि कार्यक्षमतेसाठी नऊ उप-समूहांमध्ये (सेक्टर) विभागण्यात आले आहे.  पुनर्विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सेक्टर 6 अल-एझचाही समावेश आहे, त्यासाठीचे बांधकाम 2021 मध्ये सुरू झाले. 2020 मध्ये, SBUT ने अल-सदाह नावाचा पहिला टप्पा पूर्ण केला ज्यामुळे 610 हून अधिक कुटुंबांचे आणि 128 कुटुंबांचे जीवनमान सुधारले.  ट्रस्टने रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांसाठी नियोजित बांधकामांमध्ये किरकोळ आस्थापने देखील उपलब्ध करून दिली आहेत जेणेकरून त्यांचे जीवनमान चांगले होईल आणि एक सर्वसमावेशक समाज निर्माण होईल.
पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग म्हणून, भेंडी बाजार आधुनिक सुविधा, रुंद रस्ते, शाश्वत पद्धती आणि उत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
Edited by : Ratnadeep Ranshoor