शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (08:56 IST)

मुंबई मेट्रोच्या या मार्गावरही मिळणार आता सेवा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

mumbai metro
मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच इंधन आणि प्रवाशांच्या वेळेची बचत होण्यासाठी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत मेट्रो हा उत्तम पर्याय आहे. मेट्रोबाबत लोकांच्या मनात विश्वास असून शून्य विलंब हे मेट्रो सेवेचे यश आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मेट्रो 2 अ’ या मार्गावरील सुशोभिकरण केलेल्या मेट्रो डब्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे अनावरण करण्यात आले. डहाणूकरवाडी ते दहिसर (पूर्व) दरम्यानच्या अतिरिक्त मेट्रो सेवेलाही मुख्यमंत्र्यानी हिरवा झेंडा दाखवून पुढील प्रवासासाठी रवाना केले. यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, एप्रिलमध्ये सुरु झालेल्या ‘मेट्रो 2 अ’ या मार्गिकेवरुन 38 लाख प्रवाशांनी सुखकरपणे प्रवास केला आहे. आजपर्यंत एकही गाडी विलंबाने धावली नाही किंवा मेट्रो रद्द झालेली नाही. आता मेट्रोची वारंवारिता वाढल्याने प्रवाशांचा सुखकर प्रवास होईल. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात मेट्रोची विविध कामे प्रगतीपथावर असून मेट्रोचा एक – एक टप्पा पुढे जातो आहे. त्यामुळे मेट्रोद्वारे प्रवाशांचा आरामदायी, सुखकर प्रवास व्हावा, यासाठी मेट्रोने अधिक दर्जेदार गुणवत्तापूर्ण सेवा देण्याबरोबरच आगामी प्रकल्पही वेळेआधी पूर्ण करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी डहाणूकरवाडी येथील मेट्रो अधिकारी, चालक तसेच प्रवाशांबरोबर संवाद साधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
 
दरम्यान, या मेट्रो प्रकल्पामुळे आम्ही खूप आनंदी आहोत, आमच्या वेळेची बचत झाली आहे, अशा भावना अनेक प्रवाशांनी यावेळी व्यक्त केल्या. आनंदनगर येथील 142 विद्यार्थ्यांना घेऊन आनंदनगर ते आरे पर्यंत मेट्रो धावली, याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकांनी शासनाचे आभार मानले. प्रारंभी आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी प्रास्ताविक करुन सादरीकरण केले.
 
शून्य उशिर (झीरो डिले) आणि शून्य रद्द (झिरो कॅन्सलेशन) या पद्धतीने सध्या मेट्रो गाड्या धावत आहेत.मेट्रोची विश्वासार्हता सुधारली आहे या अतिरिक्त गाड्यांमुळे मार्गावारील गाड्यांची वारंवारिता दहा मिनिटांवर येईल.दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मार्गिका 2 ए (लाईन 2 ए) अंधेरी पश्चिमेपर्यंत आणि मार्गिका 7 (लाईन 7) गुंदवली पर्यंत विस्तारित केली जाईल याचा लाखो प्रवाशांना लाभ होईल.