मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (08:12 IST)

करचुकवेगिरी: खाजगी कंपनीच्या संचालकाला १६२ कोटीच्या बोगस देयकाप्रकरणी अटक

मुंबई :  करचुकवेगिरी करुन शासकीय महसूल बुडविणाऱ्या एका खाजगी कंपनीच्या संचालकाला महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर विभागाने मुंबईतील गिरगांव येथून अटक केली.
 
में. एव्हरंट फेरोमेट प्रायव्हेट लिमिटेड या मुंबईस्थित कंपनीने मोठ्या प्रमाणावर बोगस देयके प्राप्त केल्याचे विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर वस्तू व सेवाकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीच्या संचालकांना याबाबत विचारणा केली असता कंपनीच्या संचालकांनी सुरुवातीला आपल्याला या कंपनीच्या व्यवहारांबाबत काहीच माहीत नसल्याचे सांगितले. मात्र काही कालावधीनंतर आपणच या कंपनीच्या सर्व कारभाराबाबत जबाबदार असल्याचे विभागाला कळविले. मात्र कंपनीने घेतलेल्या बोगस देयकांसंदर्भात समाधानकारक माहिती कंपनीचे संचालक देऊ शकले नाहीत; तसेच या संदर्भात विभागाने कळविलेल्या कराचा भरणादेखील कंपनीने केला नाही.
 
विभागाने या कंपनीच्या संचालकाला 162 कोटी रुपयांची बोगस बिले घेऊन 29 कोटी रुपये इतका बोगस इनपूट टॅक्स क्रेडीट प्राप्त केल्याप्रकरणी अटक केली. महानगर दंडाधिकाऱ्यांनी कंपनीच्या संचालकास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सहाय्यक राज्यकर आयुक्त रामचंद्र एन. मेश्राम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली आहे.
 
करचुकवेगीरी करणाऱ्या करदात्यावर कारवाई करीत महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने आतापर्यंत 16 वेगवेगळ्या प्रकरणांत अटकेची कारवाई केली असून 3 हजार कोटी रुपयांहून अधिक बोगस देयकांचे घोटाळे उघडकीस आणले आहेत.