बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated :मुंबई , मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (17:35 IST)

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उर्वरित कामही वेळेत आणि दर्जेदार व्हावे – संजय बनसोडे

sanjay bansode
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कामाच्या सद्यस्थितीचा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आढावा घेतला. महामार्गाचे उर्वरित काम वेळेत आणि दर्जेदार व्हावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. डिसेंबर अखेरपर्यंत प्रकल्पाचे ७६.७२ टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
नागपूर ते मुंबई या महामार्गादरम्यान भूपृष्ठ वाहतूक सुलभ होण्याच्या दृष्टीने 701 किमी लांबीचा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग तयार करण्यात येत आहे. या कामाच्या प्रगतीचा श्री.बनसोडे यांनी आढावा घेतला. यावेळी राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) चे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार, मुख्य अभियंता अनिल गायकवाड, कार्यकारी अभियंता श्री.जगताप व संबंधित अधिकारी हे उपस्थित होते.
यावेळी विभागाच्या सादरीकरणात सद्यस्थितीची माहिती देण्यात आली. सद्यस्थितीत प्रकल्पासाठी लागणारी ८,८६,९०२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दि. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे नागपूर मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग (हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) हा महत्त्वाचा प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने प्रकल्पास आवश्यक असलेला गौण खनिजांच्या उत्खननावर आकारणीपत्र असलेल्या स्वामित्वधन बसविण्यास सूट दिली आहे. बांधकाम पॅकेज १ ते १३ चे काम ३० महिन्याच्या कालावधीत व बांधकाम पॅकेज १४ ते १६ चे काम ३६ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजित आहे, यानुसार सप्टेंबर २०२२ पर्यंत प्रकल्पाची संपूर्ण कामे पूर्ण करणे नियोजित आहे.
महामार्गास दिनांक २२ डिसेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे नाव देण्यात आले आहे. प्रकल्पासाठी वन विभागाची एकूण ५४६ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली असून वन विभागाला वन विकसित करण्यासाठी इतर ठिकाणी तेवढीच जमीन उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
प्रकल्पामध्ये वन्यजीव संरक्षणासाठी एकूण ८० बांधकामे प्रस्तावित केली असून वन्यजीवांच्या वावरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ठिकाणी ध्वनिरोधकाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, आवश्यक त्या ठिकाणी संरक्षण भिंतीची उंची वाढवण्यात आली आहे. महामार्गाच्या दुतर्फा ११ लक्ष ३१ हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण प्रकल्पाच्या हद्दीमध्ये झाडे लावणे, सुशोभीकरण करणे, सिंचन व्यवस्था करणे व संपूर्ण वृक्ष लागवडीची ५ वर्ष देखभाल आदी कामे करण्यात येणार आहेत. प्रकल्पामध्ये एकूण १६१ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती होणे अपेक्षित आहे अशीही माहिती यावेळी देण्यात आली.