स्थलांतर हा नाईलाज
- भारत डोगरा
मुंबईत काही दिवसांपूर्वीच उत्तर भारतीय विशेषतः उत्तर प्रदेश व बिहारींविरोधात उग्र आंदोलन झाले. त्यांच्यावर हल्लेही झाले. पण ही बिहारी व उत्तर प्रदेशातील मंडळी मुंबई किंवा दिल्लीला जातात? नुकताच उत्तर प्रदेश व बिहारमधील अनेक गावांचा दौरा केल्यानंतर तेथील भयावह स्थिती समजू शकली. शहरात राहणार्या मंडळींना या स्थितीची कल्पनाही करता येणार नाही. कुणीही आपले गाव, घर सोडून आनंदाने बाहेर जात नाही. परिस्थितीच त्यांना तसे करण्यास मजबूर करते. उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील काही गावांत गेल्यानंतर धक्काच बसला. बुंदेलखंडाचा हा भाग सध्या दुष्काळाचा सामना करतो आहे. या दुष्काळाची तीव्रताही आगामी काळात वाढण्याची शक्यता दिसते आहे. आगामी काळात भूक व तहानेमुळे तडफडून माणसे आणि प्राणी मेल्याच्या बातम्या या भागातून आल्या तर आश्चर्य वाटू देऊ नका. आगामी चार-पाच महिन्यात या लोकांची स्थिती सुधारण्यासाठी अतिशय केंद्रीभूत प्रयत्नांची गरज आहे. दूरपर्यंत पसरलेली पडीक जमीन, आटलेल्या विहीरी आणि तलाव, चार्याच्या शोधात दूरदूरपर्यंत फिरत असलेले हडकुळे प्राणी, पर्यायच नसल्याने दोन वेळाच्या पोटाची भ्रांत भागविण्यासाठी रोजगाराच्या शोधात गाव सोडून गेलेले गावकरी, घराला लागलेली कुलपे, कमकुवत मनाने गावातच नशीबाला शिव्या देत बसलेली मंडळी, आणि घर राखायला थांबलेली वृद्ध मंडळी. हे चित्रच या परिसराची अवस्था सांगते. एकीकडे पोटाची आग जाळत असताना डोक्यावर कर्जाचा भारही या लोकांना जगू देत नाहीये. गावातल्या दलित वस्तीत रोज व्यवस्थित जेवण मिळते का असे किमान पन्नास लोकांना विचारले असता, एकही जण हो असे उत्तर देऊ शकला नाही. पोळी खाण्यासाठी भाजीच नसते. मग मिठाला लावून पोळी खाल्ली जाते. तीही पोटभर मिळत नाही. दिवसात एकदाच पोळ्या केल्या जातात. काही घरात तर अनेकदा चूलही पेटत नाही. एवढी वाईट परिस्थिती असूनही या मंडळींनी केंद्र सरकारच्या रोजगार हमी योजनेचा लाभ मिळालेला नाही. जवळपास सर्व गाव कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहे. यातील निम्म्याहून अधिक गावकरी रोजगाराच्या शोधार्थ गाव सोडून गेले आहेत. उत्तर प्रदेशातील एका भागात दुष्काळाने कहर केलेला असताना बिहारमध्ये अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. गेल्या वर्षी जवळपास दीड कोटी लोकांना पुराचा तडाखा बसला. हा पूरही भयावह होता. त्याने या परिसरातील जनजीवन उध्वस्त करून टाकले. अनेक वृद्ध मंडळींनी सांगितले, की त्यांनी असा पूर त्यांच्या आयुष्यात कधी पाहिला नाही. असे असूनही यातील अनेक पूरग्रस्तांना अद्यापही पुरेशी मदत मिळालेली नाही. पूर्व चंपारण जिल्ह्यात ११ ग्रामीण वस्त्यांमधील दोनशे लोकांशी चर्चा केल्यानंतर, विपरीत परिस्थितीमुळे त्यांचे जगणे दुष्कर झाल्याचे लक्षात आले. पूर आल्यानंतर कटवाहा गावातील बांधावर मुस्तफा खातूनने आश्रय घेतला. गेल्या चार महिन्यापासून ती तिथेच आहे. तोडक्या मोडक्या झोपडीत अजूनही रहाते आहे. कारण पूर आल्यानंतर तिचे घर दुरूस्त करण्यासाठी तिला काहीही मदत मिळालेली नाही. बांधावर रहाणारी अशी अनेक कुटुंबे आहेत. शेजारच्याच गावातील अहमदने सांगितले, की पूराने त्याच्या शेतात वाळू वाहून आणली. त्यामुळे आता तिथे शेती होऊच शकणार नाही. चारा नसल्याने व रोगांमुळे अनेक प्राणी मरत आहेत, अशी माहिती अजगरी पंचायतीच्या लोकांनी दिली. मोतीहारी ब्लॉकमध्ये सेमरा गाव आहे. तिथल्या मीरादेवीला घरात किती अन्नधान्य आहे, असे विचारले तर, तिने देवापुढे ठेवायलाही एक दाणासुद्धा नाही, असे उत्तर दिले. हाच प्रश्न कटहा पंचायत क्षेत्रातील अंबिया खातूनला विचारल्यानंतर तिला रडू आवरले नाही. पूरात तिचे घर उध्वस्त झाले. आजही ती बांधावर निर्वासित म्हणून रहाते आहे. या सगळ्या गावातील बहूतांश घरात कुलपे लागलेली दिसली. ही कुटुंबे मजूरीसाठी मुंबई, दिल्ली, पंजाब, हरियाणा, सूरत या ठिकाणी गेली आहेत. रोजगार हमी योजनेंतर्गत काम मिळाले तर बाहेर गावी जाल का असे गावातील लोकांना विचारले असता त्यांनी घरात राहूनच जर रोजगार मिळत असेल तर बाहेर जाण्याची गरजच नाही, असे सांगितले. दुसर्या राज्यात गेल्यानंतर किमान जगायला काही मिळते म्हणून आम्ही तिथे जातो. पोटाची गरज हेच आमच्या स्थलांतरीत होण्यामागचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले.