रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By विकास शिरपूरकर|

हजाराहून अधिक शिवसैनिक जेरबंद

IFM
शिवसेनेच्‍या विरोधाला न जुमानता मुंबईत 'माय नेम इज खान' प्रदर्शनाची तयारी सरकारने पूर्ण केली असून चित्रपट प्रदर्शित करणा-या थिएटर्सना गृहखात्याकडून काही मार्गदर्शक सुचना देण्‍यात आल्‍या आहेत. थिएटर बाहेर चोख सुरक्षा पुरवण्‍यासाठी पोलीस दलाची कुमक वाढवण्‍यात आली आहे. तसेच पोलिसांच्‍या साप्‍ताहिक सुट्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत.

दरम्‍यान, मुंबईसह राज्यभरात शाहरूखच्‍या चित्रपटा विरोधातील आंदोलन तीव्र झाले असून एकीकडे शिवसेनेने हा मुद्दा प्रतिष्‍ठेचा केला आहे. तर राज्‍य सरकारनेही दिल्‍लीतून आलेल्‍या आदेशानंतर शिवसेनेविरोधातील कारवाईची धार तेज केली आहे.

चित्रपटाला विरोध करून थिएटर्सची तोडफोड करणा-या आणि निदर्शने करणा-या सेनेच्‍या सुमारे 1206 कार्यकर्त्यांना अटक करण्‍यात आली असून सुमारे 70 जणांना स्‍थानबद्ध करण्‍यात आले आहे.

राज्‍य मंत्रिमंडळाच्‍या सुरक्षे संदर्भातील बैठकीनंतर चित्रपटगृह मालकांना सरकारने काही मार्गदर्शक तत्‍वे घालून दिली असून त्यानुसार थिएटरमधील पहिल्‍या तीन रांगा रिकाम्या ठेवण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहेत. चित्रपटगृहात किमान दोन सीसीटीव्‍ही कॅमेरे लावण्‍याचे आदेश देण्‍यात आले असून कुठल्‍याही परिस्थितीवर नियंत्रणासाठी चित्रपटगृहाचे सर्व दरवाजे सहज उघडता येतील याची काळजी घेण्‍याचे निर्देश देण्‍यात आले आहेत.

राज्‍यभरात चित्रपटाला होत असलेल्‍या विरोधामुळे राज्‍यातील धुळे, नांदेड व जळगावसह अनेक थिएटर चालकांनी स्‍वतःहून चित्रपट प्रदर्शित
न करण्‍याचा निर्णय घेतला आहे.