जम्मू-काश्मिरमध्ये 3 दहशतवादी हल्ले  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  जम्मू-काश्मिर येथे केवळ तीन तासात तीन दहशतवादी हल्ल्यांमुळे  खळबळ माजली आहे. या हल्ल्यात तीन स्थानिकांचा मृत्यू झाला. पहिला हल्ला श्रीनगरमधील ईक्बाल पार्कजवळ करण्यात आला होता. त्यानंतर काही क्षणातच श्रीनगरच्या जवळ असणाऱ्या हवल येथील मदीन साहिबजवळ दहशतवाद्यांनी दुसरा हल्ला केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी रस्त्यावरील फेरीवाल्यांवर गोळ्या झाडल्या. तर तिसरा दहशतवादी हल्ला हा उत्तर काश्मिर येथील बांदीपोरा जिल्ह्यात हाजीन भागात झाला. या हल्ल्यानंतर या भागात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे.
				  													
						
																							
									  
	 
	हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे माखनलाल, वीरेंद्र पासवान, मोहम्मद शफी अशी आहेत. माखनलाल हे काश्मिरी पंडीत असून त्यांचं श्रीनगर भागात औषधाचं दुकान होतं. तर वीरेंद्र पासवान हा फेरीवाला असून तो मुळचा बिहारचा असल्याचं समोर आलं आहे. यानंतर मोहम्मद शफी हा बांदीपोरा येथील हाजीन भागात राहत होता. त्याचा रुग्णालयात उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झाला.
				  				  
	 
	पोलिसांनी हल्ले झाल्यानंतर लगेचच या दहशतवाद्यांना शोधण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचबरोबर या हल्ल्यांमध्ये स्थानिक नागरिक हेच दहशतवाद्यांचे लक्ष्य होते, अशी माहितीही पोलिसांना मिळाली आहे. या तीन हल्ल्याच्या घटनांनंतर या परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे जम्मू पोलिसही अधिक सक्रीय झाले असून परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विशेषत: श्रीनगर आणि बांदीपोरा भागात मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले आहेत.