शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 डिसेंबर 2023 (19:18 IST)

आयुर्वेदिक कफ सिरप प्यायल्यानंतर 5 लोकांचा मृत्यू

गुजरात राज्यातील एका गावात देवदिवाळीच्या सणानिमित्त आयोजित कार्यक्रमात काही जणांनी कफ सिरप प्यायल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. यातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
ही घटना मध्य गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील नडियादजवळील बिलोदरा गावात घटना घडली असून या कार्यक्रमासाठी इतरही गावातून लोक आले होते. या कार्यक्रमात सिरप प्यायल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली म्हणून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
 
त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे.
 
घटना नेमकी कशी घडली?
गावात मांडवी कार्यक्रम सुरू असताना लोकांनी सिरप प्यायल्याने त्यांची प्रकृती बिघडली, काही लोकांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांची भेट घेतली.
 
त्यांच्याशी झालेल्या संभाषणात या सर्वांनी संशयास्पद सिरप प्यायल्याची घटना समोर आली.
हा प्रकार उघडकीस येताच राज्य सरकारच्या अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. मात्र आयुर्वेदिक सिरप प्यायल्यानंतर संशयास्पद मृत्यू झाल्याने सरकारवरही प्रश्नचिन्ह आणि टीकेची झोड उठली आहे.
 
याप्रकरणी विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला असून, दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
 
खेडा जिल्ह्याचे पोलीसप्रमुख राजेश गढिया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, "29 नोव्हेंबर रोजी दुपारी पोलिसांना खेडा जिल्ह्यातील बिलोदरा आणि बागडू गावात काही लोकांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्याबरोबर पोलिसांच्या एका पथकाने ताबडतोब तपास सुरू केला."
 
या प्रकरणाचा तपास केला असता असं समजलं की, "वडदळा गावातील मितेश चौहान हे 27 नोव्हेंबरला बागडू गावात आपल्या चुलत भावाच्या घरी गेले होते. सकाळी मितेश चौहान यांच्या छातीत दुखू लागलं. त्यांना तातडीने मेहमदाबादला नेण्यात आलं. जिथे त्यांचा मृत्यू झाला."
 
"त्यांना योग्य उपचार मिळाले नाहीत. पुढे अंत्यसंस्काराच्या वेळी अल्पेशभाई सोढा यांच्याही छातीत दुखू लागलं. दरम्यान, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचाही मृत्यू झाला. अल्पेशभाई कर्करोगाचे रुग्ण होते. या दोघांचा मृत्यू होईपर्यंत आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार होईपर्यंत कुटुंबाने किंवा रुग्णालयाने पोलिसांना कळवलं नव्हतं."
 
त्यांनी पुढे सांगितलं की, "बिलोदरा गावातील तीन व्यक्ती अशोकभाई, अर्जुनभाई आणि नटूभाई यांचाही मृत्यू झाला. अशोकभाईंची प्रकृती खालावली आणि गावातच त्यांचं निधन झालं. अर्जुनभाई आणि नटूभाई यांना त्यांच्या कुटुंबीयांनी महागुजरात हॉस्पिटलमध्ये नेलं पण इथे अर्जुनभाई यांचा मृत्यू झाला."
 
मृत्यूची मालिका
राजेश गढिया पुढे म्हणाले, "वरील चारही मृत्यूंची माहिती रुग्णालय किंवा कुटुंबीयांनी पोलिसांना दिली नाही. अंतिम संस्कार झाल्यानंतर काहीतरी संशयास्पद घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलिसांनी पाचवा रुग्ण नटूभाई ज्या महागुजरात हॉस्पिटलमध्ये दाखल होता तिथे जाऊन डॉक्टरांशी चर्चा करून लक्षणांची माहिती घेतली."
 
"नटुभाईच्या कुटुंबीयांनी नटूभाईंचा डिस्चार्ज घेऊन घरी नेलं पण रात्री उशिरा नटूभाईंचा मृत्यू झाला. नटूभाईंच्या कुटुंबीयांना शव विच्छेदनाचं महत्व पटवून दिल्यानंतर त्यांचा मृतदेह सरकारी रुग्णालयात आणण्यात आला. अपघाती मृत्यूची (अकस्मात मृत्यू) नोंद करून त्यांच्या रक्ताचा नमुना एफएसएलकडे पाठवण्यात आला. 27 नोव्हेंबरला तीन आणि 28 नोव्हेंबरला दोन असे एकूण 5 मृत्यू झाले."
 
पण हे सर्व मृत्यू सिरप प्यायल्यामुळेच झाले आहेत हे कसं समजलं यावर पोलीस अधिकारी राजेश गढिया सांगतात, "बागडू आणि वडदळा गावातील मृत्यूंबाबत सविस्तर चौकशी केली असता हे सिरप प्रकरण समोर आलं. आयुर्वेदिक मेघासव सिरप विकणारे बिलोदरा येथील नारनभाई उर्फ किशोरभाई सोढा म्हणले की, हे सिरप केवळ बागडूमध्ये गावातील लोकांनीच घेतलेलं आहे."
 
"मेघासव हे एक आयुर्वेदिक सिरप आहे. सिरपच्या बॉटलवर सामग्री, तसेच स्व-निर्मित अल्कोहोलची टक्केवारी याबद्दल माहिती दिली आहे. हे सिरप थंडीच्या दिवसात घेतले जाते. या संदर्भात तज्ज्ञांचं मत आवश्यक असल्याने अन्न व औषध विभागाचे अधिकारी तसेच एफएसएलचे अधिकारी तपासणी करत आहेत. आयुर्वेदिक सिरप उत्पादनासाठी परवाना आवश्यक आहे, परंतु विक्रीसाठी कोणत्याही प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता नाही आणि ते कोणालाही विकू शकतात."
 
हे सिरप कोण विकत होतं?
या सिरपचा विषय निघताच पोलिसांनी त्या दिशेने अधिक चौकशी सुरू केली.
 
अधिकारी राजेश गढिया यांनी सिरपच्या तपासाबाबत सांगितलं की, "गावात संशयास्पद मृत्यूची चर्चा सुरू असताना किशोर नावाची व्यक्ती पळून गेली.
 
किशोरला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. किशोरने चौकशीत सांगितलं की, तो एका व्यक्तीकडून सिरप घेत होता. त्याआधारे या व्यक्तीची चौकशी करण्यात आली."
 
"त्याच्या चौकशीच्याआधारे अहमदाबादमधील एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याचीही चौकशी सुरू आहे. किशोरच्या म्हणण्यानुसार, त्याचे बिलोदरा येथे किराणा मालाचे दुकान आहे. तो गेल्या काही वर्षांपासून अशा आयुर्वेदिक सिरपची विक्री करत होता. हे सिरप तो 100 रुपयांना खरेदी करायचा आणि 130 रुपयांना विकायचा."
 
सिरप विकणारे किशोर सोढा यांचे वडील शंकरभाई सोढा यांनी दुकानातलं सिरप प्यायल्याचं चौकशीत समोर आलं.
 
त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने अहमदाबाद येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शंकरभाई सोढा यांनी आपल्या मुलाच्या दुकानातून हे सिरप प्यायल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याचं पोलिस निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
"बिलोदरा गावातील बलदेव भाई यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांनी देखील 26 नोव्हेंबर रोजी किशोरभाईंच्या दुकानातून हे सिरप घेतलं होतं. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, छातीत दुखायला लागलं आणि उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून आता त्यांची तब्येत बरी आहे."
 
रक्ताच्या नमुन्यात मिथाइल अल्कोहोल
या घटनेत वैद्यकीय तपासणी आणि एफएसएलची भूमिकाही महत्त्वाची ठरली आहे.
 
जिल्हा पोलिस प्रमुख राजेश गढिया म्हणाले, "नटूभाई आणि शंकर सोढा यांच्या रक्ताचे नमुने एफएसएल गांधीनगरला पाठवण्यात आले आहेत. अहवालानुसार त्यांच्या रक्तात मिथाइल अल्कोहोल आढळून आलं आहे. हा अहवाल आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे."
"त्यात इथेनॉल नाहीये. इथेनॉल म्हणजे अल्कोहोल. पण आयुर्वेदिक सिरपमध्ये मिथाइल अल्कोहोल (मिथेनॉल) कसं सापडलं? यात इतर काही भेसळ आहे का? हे मिथेनॉल कोणी आणि केव्हा मिसळलं? याचा तपास सुरू आहे. आम्ही अन्न आणि औषध विभागाचे अधिकारी तसेच एफएसएल अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहोत."
 
"सध्या तिघांची चौकशी सुरू असून त्यांच्या कुटुंबाशी चर्चा सुरू आहे. कुटुंबातील एका सदस्याने सांगितलं की, ते गेल्या सहा महिन्यांपासून हे सिरप घेत आहेत. तर दुसऱ्या एका सदस्याने सांगितलं की, त्यांना दारूचं व्यसन नव्हतं. याबाबत गावचे नेते, सरपंच यांच्याकडून माहिती गोळा करणं सुरू आहे."
 
"तब्बल 55 लोकांनी या सिरपचं सेवन केलं आहे. त्यापैकी 7 जण बाधित झालेत. त्या दिशेने आमचा तपास सुरू आहे. किशोर विरोधात अद्याप दारूबंदीशी संबंधित कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. एका बॉटल मध्ये 375 मिली सिरप मिळायचे. बॉटलवर डोसचं प्रमाण नमूद केलेलं आहे. गावकऱ्यांना विचारलं असता ते सांगतात की, या आयुर्वेदिक सिरपचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याने ते याचं सेवन करतात. त्यामुळे बाधितांनी याचं अधिक सेवन केलं असण्याची शक्यता आहे."
 
हे सिरप कुठे बनवलं होतं?
माध्यमांशी बोलताना गुजरातचे डीजीपी विकास सहाय म्हणाले, "किशोर सोढा नामक व्यक्ती या आयुर्वेदिक सिरपची विक्री करत होता. त्याने स्वतः 50 ते 55 लोकांना हे औषध दिलं होतं. हे सिरप एखाद्या कफ सिरप किंवा टॉनिकसारखं काम करतं.
 
मात्र हे सिरप प्यायल्यानंतर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक चौकशीत अन्य दोघांचा मृत्यू या सिरपमुळे झाला नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सध्या तपास सुरू आहे. किशोरने हे सिरप कोठून आणले याची चौकशी सुरू आहे. त्याच्या आधारे आणखी दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे."
 
"सुरुवातीला हे आयुर्वेदिक कफ सिरप असल्याचं दिसतं आहे. मात्र काही उत्पादन दोषांमुळे त्यात मिथेनॉल आलं असावं. त्यामुळे ते पिणाऱ्या लोकांचा मृत्यू झाला आहे. किशोरच्या म्हणण्यानुसार 50 ते 55 जणांनी हे सिरप प्यायलं होतं. या सर्वांची खेडा पोलिसांनी चौकशी केली असता सर्वांची प्रकृती ठीक असल्याचं दिसून आलं आहे. यातील केवळ एकाच व्यक्तीला त्रास झाला होता मात्र त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं."
 
या घटनेबाबत गुजरात राज्य सरकारचे आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल म्हणाले, "राज्यात कोणत्याही प्रकारच्या सिरप विक्रीसाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीसाठी परवाना घेणं बंधनकारक आहे.
 
नडियाद येथील घटनेत, या आयुर्वेदिक पदार्थात दुसरं रसायन मिसळल्याचं प्राथमिक तपासात निदर्शनास आलं आहे. हे रसायन बाहेरच्या राज्यातून आणल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागाने तपास सुरू केला आहे.
 
त्याचबरोबर कायदेशीर कारवाईही सुरू केली आहे. अन्न व औषध विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुढील तपासणीसाठी एफएसएलकडे नमुने पाठविण्यात आले आहेत."
 
'गंभीर आणि चिंताजनक घटना'
या घटनेवर गुजरात प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते मनीष दोशी म्हणाले, "गुजरातच्या खेडा जिल्ह्यात खोकल्याच्या सिरपसोबत मादक पदार्थ घेतल्याने 5 तरुणांचा मृत्यू झाला आहे. ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. याआधीही अशीच घटना घडली होती, ज्यामध्ये 70 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेतूनही सरकारने धडा घेतलेला नाही. सरकारने समाजकंटकांना बिनदिक्कत सवलत दिली आहे, त्यामुळे अमली पदार्थांचा धंदा सुरूच आहे."

"दारू, अंमली पदार्थ आणि इतर मादक पदार्थांमुळे गुजरातमधील तरुण उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र शासनाकडून चालवला जाणारा हप्ता आणि समाजकंटकांना दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे अमली पदार्थांचे सेवन वाढत आहे. त्यामुळे तरुणांचे जीव जात आहेत. अशा समाजकंटकांवर सरकारने तसेच गृहविभागाने कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. जेणेकरून गुजरातमधील अंमली पदार्थांचे व्यसन थांबेल."
 
राज्य सरकारच्या अन्न आणि औषध विभागाचे संचालक हेमंत कोशिया यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं की, "हे खोकल्याचं सिरप नसून आसव अरिष्ट आहे. ते बनवण्यासाठी परवाना लागतो पण विकण्यासाठी परवाना लागत नाही.
 
गुजरातमध्ये आसव अरिष्ट बनवण्यासाठी चार ते पाच जणांकडे परवाने होते. मात्र हे सर्वजण परवान्याचा गैरवापर करत असल्याचं आढळून आल्यावर त्यांचे परवाने रद्द करण्यात आले."
 
"सध्या गुजरातमध्ये कोणाकडेही अशा प्रकारचे सिरप बनवण्याचा परवाना नाही. या सिरपवर सरखेज भागाचा पत्ता देण्यात आला आहे. मात्र आमच्या पथकाने तपास केला असता असे कोणतेही कार्यालय आढळून आले नाही."
 
ते पुढे म्हणाले, "आसवं-अरिष्टं बनवताना त्यात 12% स्वयं-निर्मित अल्कोहोल असतं. मात्र यामुळे व्यक्तीच्या जीवाला धोका नसतो. पण जर हे एखाद्या दुसऱ्या पदार्थापासून बनविलेलं असेल तर हे गुन्हेगारी कृत्य आहे. आम्ही राज्यात याची तपासणी सुरू केली आहे."
 
Published By- Priya Dixit