1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 12 मे 2021 (16:20 IST)

भय्यू महाराज यांच्या मातोश्री कुमुदिनी देवी यांचे निधन, मात्र अंत्यसंस्कारावरून वाद

Death of Bhayyu Maharaj's mother Shri Kumudini Devi
दिवंगत आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या मातोश्री कुमुदिनी देवी यांचे निधन झाले. इंदौरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कुमुदिनी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची इच्छा भय्यू महाराजांची कन्या कुहूने व्यक्त केली. मात्र महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आयुषी यांनी आडकाठी केल्याने अंत्यसंस्कारावरुन दोघींमध्ये वाद झाला. 
 
कुमुदिनी देवी या भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात महत्त्वाच्या साक्षीदार होत्या. आजारपणामुळे त्यांच्यावर मध्य प्रदेशातील इंदौरमधील इंडेक्स मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु होते. परंतु शनिवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुक्तिधाममध्ये जात कुहूने आजीवर अंत्यसंस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली. आजोबा आणि पिता भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले होते, त्यामुळे हिंदू रिवाजानुसार आजी कुमुदिनी यांच्यावरही मलाच अंत्यसंस्कार करु द्या, अशी विनंती कुहूने केली. भय्यू महाराजांची दुसरी पत्नी अर्थात कुहूची सावत्र आई आयुषी यांनी आक्षेप घेतला. आयुषी यांच्या नातेवाईकांनीही त्यांची बाजू उचलून धरली. त्यामुळे अंत्यसंस्कार कोण करणार या मुद्द्यावर दोघींमध्ये कित्येक तास वाद झाला.