शनिवार, 1 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 12 ऑगस्ट 2020 (20:24 IST)

भारतीय सैन्य कुठल्याही स्थितीसाठी सज्जः सीडीएस बिपीन रावत

india china
भारत आणि चीनमध्ये सीमेवर तणाव कायम आहे. दोन्ही देशांदरम्यान अनेकदा राजनैतिक आणि सैन्य पातळीवरील बैठका झाल्या आहेत. पण चीनची दगाबाजी सुरूच आहे. काहीही करून भारताच्या हद्दीत बांधकाम करण्याचा चीनचा प्रयत्न होता. पण प्रत्येक वेळी भारतीय लष्कराच्या जवानांनी चीनचा कुरघोडीचा प्रयत्न उधळून लावला. यामुळे चीन लालबुंद झाला असून दात मिठ्या खातोय. प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे. यापार्श्वभूमीवर सीडीएस (chief of defence staff) बिपीन रावत यांनी संसदीय समितीला संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली.

भारतीय सैन्य सज्जः रावत
देशाचे सैन्य पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवर कोणत्याही स्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज आहे. कडाक्याच्या थंडीतही सैन्य तैनातीसाठी तयार आहे, असं रावत यांनी संसदीय समितीला सांगितलं. समितीच्या सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली.

रावत यांनी समितीला दिली ताजी माहिती
जनरल रावत हे सोमवारी वरिष्ठ कमांडरसह संसदेच्या लोक लेखा समितीसमोर हजर झाले. यावेळी त्यांनी भारत-चीन तणावाबद्दल माहिती दिली. उंच डोंगररांमध्ये तैनात असलेल्या जवानांसाठी कपड्यांची खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून ते हजर झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. चर्चेदरम्यान समितीतील अनेक सदस्यांनी जनरल रावत यांच्याकडूनं पूर्व लद्दाखमधील भारत आणि चीन सैन्यामधील तणावाबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारताचे सैन्य कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहे, असं रावत यांनी यावेळी सांगितलं.

आत्मविश्वासाने बोलले जनरल रावत
जनरल रावत यांच्यात आत्मविश्वास दिसून आला. भारतीय सैन्य दीर्घकाळ तणावाच्या स्थितीसाठी सज्ज आहे. पीएसीचे प्रमुख कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी हे आहेत. पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्यासाठी सैन्याला मागे हटवण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात मुत्सद्दी आणि सैन्य स्तरावर चर्चा सुरू आहे.