कुलभूषण जाधव यांना आज मिळणार दुतावासाची मदत
हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये कैद असणाऱ्या भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना आज दुतावासाची मदत मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासासोबत आज भेटता येणार आहे. याविषयीची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
भारतीय निवृत्त नौदलाचे अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या अटकेची माहिती लवकर न देता तसेच त्यांना त्यांच्या देशाच्या वकिलातीसोबत बोलणे न करू देणे हा पाकिस्तानने जिन्हेव्हा कराराचा भंग केला आहे. असा निर्णय संयुक्त राष्ट्राच्या दि हेग आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला. पाकिस्तानने जाधव यांना त्यांच्या वकिलातीसोबत चर्चा करू द्यावी तसेच त्यांना दिलेल्या शिक्षेचा परिणामकारक फेरविचार करावा असेही न्यायालयाने म्हटले होते. त्यानुसार पाकिस्तानने आपण केलेल्या चुकीचे परिमार्जन करण्याच्या हेतूने आता कुलभूषण जाधव यांना आज दुतावासासोबत भेटण्याची परवानगी दिली आहे.