गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 22 जून 2021 (07:54 IST)

दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक

Meeting of the National Working Committee
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक आज मंगळवारी (२२ जून) दिल्लीत होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. 
 
या बैठकीला सर्व निमंत्रित सदस्य आणि स्थायी सदस्य सहभागी होणार आहेत. या बैठकीत विविध अजेंड्यावर चर्चा होणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान या बैठकीनंतर शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत असेही नवाब मलिक म्हणाले. 
 
आगामी लोकसभेच्या अधिवेशनाबाबत यामध्ये चर्चा होणार आहे. शिवाय देशातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा केली जाणार आहे. संपूर्ण देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम उद्यापासून शरद पवार करणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. 
 
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मुंबईत पवारसाहेबांची भेट घेतली होती आणि आज दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असून या भेटीत त्यांनी देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती त्यांच्याकडे जी उपलब्ध होती ती दिल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.