सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 26 फेब्रुवारी 2023 (14:08 IST)

मोदी सरकारने 9 वर्षांत बदलली ‘या’ शहर-जिल्हे आणि रेल्वे स्थानकांची नावे, वाचा संपूर्ण यादी

narendra modi
महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांची नावे आता बदलण्यात आली आहेत. आता हे जिल्हे अनुक्रमे 'छत्रपती संभाजीनगर' आणि 'धाराशिव' या नव्या नावांनी ओळखली जातील. वरील दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या वर्षी जुलै महिन्यात घेतला होता. या निर्णयाला शुक्रवारी (24 फेब्रुवारी) केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
 
नरेंद्र मोदी सरकार 2014 साली सत्तेत आल्यापासून गेल्या 9 वर्षांत त्यांनी देशातील अनेक शहरांचं नामांतर केलं आहे.
 
त्यामध्ये देशातील प्रमुख शहर-जिल्हेच नव्हे तर अनेक सरकारी योजनांशिवाय विविध शहरे-राज्यांमधील स्थानिक रस्ते आणि ठिकाणांचं नाव प्रशासनाकडून बदलण्यात आलं आहे.
 
नावात काय ठेवलंय?
नावात काय ठेवलंय, असं आपण बोलताना नेहमी म्हणत असतो. मात्र, शहर-जिल्ह्यांचं नामांतर करण्याचं काम मोदी सरकारकडून सुरुवातीपासून सुरूच आहे.
खरंतर, विविध ठिकाणे आणि योजना यांचं नाव बदलण्याचं सत्र भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच सुरू झालं होतं. पण मोदी सरकारच्या काळात नामांतराच्या प्रक्रियेला मोठा वेग मिळाल्याचं दिसून येतं.
 
त्यामुळे, नाव बदलण्याबाबतच्या मोदी सरकारच्या या धोरणावर विरोधी पक्ष आणि तज्ज्ञांकडून वेळोवेळी टीका करण्यात आली आहे.
2014 मध्ये तर कर्नाटकच्या 12 शहरांच्या नावात बदल करण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारने एकाच वेळी मंजुरी दिली होती.
 
हा निर्णय कर्नाटकच्या भाजप आणि जनता दल पक्षाच्या युती सरकारने 2007 सालीच घेतला होता. मात्र, केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) सरकारकडून त्यासाठीचा प्रस्ताव थंड बस्त्यात ठेवण्यात आला होता.
 
अखेर, मे 2014 मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर या निर्णयाला तत्काळ मंजुरी मिळाली. 1 नोव्हेंबर 2014 पासून या 12 शहरांच्या नव्या नावाचा वापर सुरू करण्यात आला. इथूनच मोदी सरकारच्या कार्यकाळाती नामांतराचं सत्र सुरू झालं.
यानंतर पुढील काळात सुमारे शहर-जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली आहेत. त्याशिवाय, या कालावधीत रेल्वे स्थानके, इतर ठिकाणे आणि स्थानिक रस्त्यांची नावे बदलल्याची यादीही मोठी आहे.
 
नाव बदलण्याची प्रक्रिया काय आहे?
कोणत्याही शहर-जिल्ह्याच्या ठिकाणाचं नाव बदलण्याचा अधिकार हा संबंधित राज्य सरकारकडे असतो. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाकडून हा निर्णय मंजूर करून घ्यावा लागतो. साधारपणपणे संबंधित ठिकाणाहून होणाऱ्या मागणीनंतर त्या प्रस्तावावर विचार केला जातो. त्यासाठी एखादे आमदार सरकारसमोर हा विषय मांडतात.
कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्यावर राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब होतं. यानंतर पुढे हा प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवला जातो.
 
त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालय यासंदर्भात इतर संबंधित मंत्रालय आणि संबंधित विभागांकडून ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) घेतं. यामध्ये रेल्वे, पोस्ट विभाग, परिवहन मंत्रालय इत्यादींचा समावेश असतो.
 
या सर्व विभागांकडून NOC मिळाल्यानंतर गृह मंत्रालय नामांतरासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला मंजुरी देतं.
मोदी सरकारने बदललेली प्रमुख शहर-जिल्ह्यांची नावे -
पूर्वीचं नाव - बदललेलं नाव
 
बंगलोर - बंगळुरू (कर्नाटक)
 
मंगलोर - मंगळुरू (कर्नाटक)
 
म्हैसूर - म्हैसुरू (कर्नाटक)
 
गुलबर्गा - कलबुर्गी (कर्नाटक)
 
हुबळी - हुब्बळी (कर्नाटक)
 
शिमोगा - शिवमोगा (कर्नाटक)
 
चिकमंगळूर - चिक्कमंगळुरू (कर्नाटक)
 
बेल्लारी - बळ्ळारी (कर्नाटक)
 
बिजापूर - विजयपुरा (कर्नाटक)
 
हॉस्पेट - होसपेटे (कर्नाटक)
 
तुमकूर - तुमकुरू (कर्नाटक)
 
राजमुंद्री - राजमहेंद्रवरम (आंध्र प्रदेश)
 
गुडगाव - गुरुग्राम (हरयाणा)
 
अलाहाबाद - प्रयागराज (उत्तर प्रदेश)
 
न्यू रायपूर - अटल नगर (छत्तीसगढ)
 
होशंगाबाद - नर्मदापुरम (मध्य प्रदेश)
 
औरंगाबाद - छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र)
 
उस्मानाबाद - धाराशिव (महाराष्ट्र)
या रेल्वे स्थानकांना मिळालं नवीन नाव -
पूर्वीचं नाव - बदललेलं नाव
 
छत्रपती शिवाजी टर्मिनस - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (महाराष्ट्र)
 
बंगळुरू सेंट्रल - स्वातंत्र्यसैनिक संगोल्ली रायण्णा स्टेशन (कर्नाटक)
 
झांसी - वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन (मध्य प्रदेश)
 
मुघलसराय - दीन दयाळ उपाध्याय स्टेशन (उत्तर प्रदेश)
 
हबीबगंज - राणी कमलापती रेल्वे स्टेशन (मध्य प्रदेश)
 
फैजाबाद जंक्शन - अयोध्या कँटोनमेंट जंक्शन (उत्तर प्रदेश
 
हुब्बळी रेल्वे स्टेशन - सिद्धारूढ स्वामीजी रेल्वे स्टेशन (कर्नाटक)
 
ओशिवरा - राम मंदिर (महाराष्ट्र)
 
एलफिन्स्टन रोड - प्रभादेवी (महाराष्ट्र)
 
मंडुआडीह - बनारस (उत्तर प्रदेश)
 
दांदुपूर - माँ वराही देवी धाम रेल्वे स्टेशन (उत्तर प्रदेश)
 
रॉबर्ट्सगंज - सोनभद्र (उत्तर प्रदेश)
 
पातालपानी - टंट्या भिल मामा रेल्वे स्टेशन (मध्य प्रदेश)
 
मियाँ का बाडा - महेश नगर हाल्ट (राजस्थान)
 
केवडिया - एकता नगर (गुजरात)
 
पांकी - पांकी धाम (उत्तर प्रदेश)
 
या व्यतिरिक्त, गुजरातमधील कांडला पोर्ट या बंदराचं नाव बदलून दीनदयाल पोर्ट असं नवीन नाव त्या बंदराला देण्यात आलं आहे.
राजधानी दिल्लीतील बदललेल्या ठिकाणांची नावे -
पूर्वीचे नाव - बदललेलं नाव
 
मुघल गार्डन्स - अमृत उद्यान
 
रेसकोर्स रोड - लोककल्याण मार्ग
 
राजपथ - कर्तव्य पथ
 
औरंगजेब रोड - एपीजे अब्दुल कलाम रोड
 
तीन मूर्ती चौक - तीन मूर्ती-हायफा चौक
 
डलहौसी रोड - दाराशिकोह रोड
 
नामांतरासाठी इतर मागण्या
देशभरातील ठिकाणांची नावे बदलली जात असताना शहर-जिल्हेच नव्हे तर राज्यांची नावे बदलण्यासाठीही मागण्या स्थानिक पातळीवरून होत आहेत.
 
त्यामध्ये पश्चिम बंगाल (West Bengal) चं नाव बदलून बांग्ला, तर केरळचं नाव बदलून केरलम असं करण्याची प्रमुख मागणी आहे.
 
त्याशिवाय इतर काही शहर-जिल्ह्यांची नावे बदलण्याच्या मागण्या अधूनमधून होत असतात.
 
त्यामध्ये मध्य प्रदेशची राजधानी भोपाळचं नामांतर भोजपाल, तेलंगणाची राजधानी हैदराबादचं नामांतर भाग्यनगर, गुजरातची राजधानी अहमदाबादचं नामांतर कर्णावती, बिहारची राजधानी पटनाचं नाव बदलून पाटलीपुत्र, हिमाचल प्रदेशची राजधानी सिमलाचं नाव बदलून श्यामला, उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरचं नाव बदलून लक्ष्मी नगर असं करण्याची मागणी किंवा प्रस्ताव आहेत.
 
महाराष्ट्रात औरंगाबाद आणि उस्मानाबादशिवाय आणखी काही शहर-जिल्ह्यांची नावे बदलण्याची मागणीही करण्यात येते. त्यामध्ये अहमदनगरचं नाव बदलून नगर, इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याची मागणी राजकीय पक्ष अथवा संघटनांकडून करण्यात येत असते.

Published By- Priya Dixit