ताजमहालावर माकडांचे संकट, संख्या वाढली  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  जगातल्या  सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालमध्ये माकडांनी उच्छाद मांडला आहे. माकडांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी करण्यात आली. त्यासाठी जिल्हाप्रशासनाने तब्बल 2 कोटी रुपये खर्च केले. त्यांना पकडण्यासाठी पिंजरेही लावण्यात आले. पण एवढे करूनही माकडांची संख्या घटलेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
				  													
						
																							
									  
	 
	ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर माकडांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या. यामुळे माकडांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाप्रशासनाने पुढाकार घेत त्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एका स्वयंसेवी संस्थेने माकडांची नसबंदी करण्याची मोहिम हाती घेतली. यामोहिमे अंतर्गत आतापर्यंत 500 माकडांची नसबंदी करण्यात आली. त्यानंतर त्यांना ताजमहाल परिसरात न सोडता दुसऱ्या जंगल परिसरात सोडण्यात आले. पण त्यामुळे माकडं अधिकच आक्रमक झाली व पुन्हा ताजमहाल परिसरात आली. माकडांच्या नसबंदीसाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल 1 कोटी 86 लाख रुपये खर्च केले होते. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट माकडांची संख्या वाढल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले. एका माकडाच्या नसबंदीसाठी 37 हजार रुपये खर्च झाल्याचे स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे. तसेच प्रशासनाला दिलेल्या अहवालात 10 हजार माकडांची नसबंदी झाल्याचे या संस्थेने म्हटले आहे.