शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 (11:02 IST)

मोदींनी सांगितले कॅशलेसचे पाच सोपे मार्ग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असताना पंतप्रधान मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी नुकत्याच झालेल्या 'मन की बात' या कार्यक्रमातून कॅशलेस अर्थव्यवस्थेवर जोर दिला आहे. आता त्यापुढे जात आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून कॅशलेस व्यवहारांसाठी मोदींनी आग्रह धरला आहे. 'मेरा मोबाइल...मेरा बँक...मेरा बटुआ' असा संदेश देत कॅशलेस व्यवहारांसाठी पाच सोपे मार्गही मोदींनी सांगितले आहेत. 
 
युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआई )चा वापर करून कुठल्याही ठिकाणाहून पैशाच्या घेण्या देण्यासंबंधीचा  व्यवहार करू शकता. प्रत्येक बँकेचे स्वतःचे मोबाइल अॅप आहेत. त्यामुळे आता आपल्या स्मार्टफोन वरून व्यवहार करणे शक्य आहे. त्यासाठी तुमच्या बँकेत किंवा एटीएममध्ये मोबाइल क्रमांक रजिस्टर करा. मोबाइल वर ‘यूपीआई' अॅप डाउनलोड करा. तुमचा युनिक आयडी तयार करा. आणि यूपीआई पिन सेट करा. यामुळे कोणत्याही दोन व्यक्तींना कोणत्याही ठिकाणावरून खरेदी-विक्री व्यवहार करणे सोपे होणार आहे. 
 
ई-वॉलेटद्वारे तुमच्या मोबाइल वा कंप्युटरमधून पैशांचे व्यवहार करणे शक्य आहेत. आपल्या सोयीसाठी एक ई-वॉलेट सेवा निवडा आणि त्याचे अॅप डाउनलोड करा. तुमचा मोबाइल क्रमांक रजिस्टर करा. या अॅपमधून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगशी जोडले जा. ई-वॉलेट सेवा देणाऱ्या अनेक कंपन्या तर ग्राहकांना रिचार्ज निवडीचे अनेक पर्यायही देतात.
 
'पॉइंट ऑफ सेल' म्हणजेच 'विक्रीचे ठिकाण'. आपले डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट्स करण्याची ही सुविधा आहे. आपले बँक खाते असलेल्या बँकेतून 'डेबिट कार्ड' मिळवा किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करा. बँक खाते उघडल्यानंतर आपोआप डेबिट कार्ड मिळून जाते. ते कार्ड पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी जगभरातील कोणत्याही एटीएममध्ये वापरता येते. ऑनलाइन व्यवहारासाठीही कार्ड वापरले जाऊ शकते. 
 
आधार सक्षम पेमेंट सिस्टीम (एईपीएस) चा वापर करून बाकी रकमेची (बॅलन्स) चौकशी, कॅश काढणे, भरणे आणि आधार कार्ड-ते-आधार कार्ड फंड ट्रान्सफर सोपे होते. ग्रामीण भागात ही सुविधा उपयोगी पडू शकते, जिथे बँकिंग प्रतिनिधींद्वारे व्यवहार केले जातात.
 
अविस्तृत पूरक सेवा माहिती (यूएसएसडी) या प्रणालीद्वारे कोणत्याही मोबाइल फोनच्या इंटरफेसमधून तुम्ही पैसे पाठवू शकता. यासाठी स्मार्टफोन, मोबाइल इंटरनेट कनेक्शन अशा कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही. अगदी साध्या मोबाईलनेही तुम्ही या प्रणालीद्वारे पैसे पाठवू शकता. 
 
अशा विविध प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून कॅशलेस व्यवहार करता येतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.