शनिवार, 4 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 24 एप्रिल 2021 (08:55 IST)

प्रधानमंत्र्यांसमवेत मुख्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा; कोविडची लढाई जिंकण्याचा आत्मविश्वास

Positive discussions
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोविड संसर्ग रोखण्यावर लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय म्हणून सांगितला. महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने असे कडक निर्बंध लावण्याची वेळ आली आहे, मात्र आम्ही अर्थचक्राला झळ बसू नये याची देखील काळजी घेत आहोत असे स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही लढाई आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकूच असा आत्मविश्वास व्यक्त केला. राज्यात मोठ्या प्रमाणावर निवृत्त डॉक्टर्स, परिचारिका यांची देखील मदत घेण्यात येत असून रुग्णांस तात्काळ योग्य ते उपचार सुरु व्हावेत म्हणून टेलीमेडिसिन व टेली आयसीयूवर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमवेत कोविडसंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीत देशातील सर्वात जास्त कोविड संसर्ग फैलावलेल्या इतर राज्यांचेही मुख्यमंत्री सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणांच्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक ती औषधे देऊन उपचार करण्यात येत आहेत तसेच निवृत्त डॉक्टर्सच्या जोडीने वैद्यकीय विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येत आहे, अशी माहितीही दिली.
 
रेमडेसिवीर, लस पुरवठा वाढवावा
महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून रेमडेसिवीरचा पुरेसा पुरवठाही आवश्यक आहे. ऑक्सिजन विमानाने आणणे शक्य नसल्यास वेळ वाचविण्यासाठी रिकामे टँकर्स विमानाने प्लॅंट्सच्या ठिकाणी पाठवून ऑक्सिजन भरून इतर मार्गाने महाराष्ट्राला मिळावा अशी मागणी करून मुख्यमंत्री म्हणाले की, ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने त्यांना संसर्ग थोपवता आलेला आहे. आपल्याकडे लस उत्पादक कंपन्यांची मर्यादित क्षमता पाहता त्यामुळेच इतर देशांतून उत्पादन होत असलेल्या लसी आम्ही आयात करून लसीकरण अधिक गतीने वाढवू शकतो का यावर मार्गदर्शन करावे.
 
रेमडेसिवीर किती उपयुक्त आहे ते सांगता येत नाही पण रुग्णांचा रुग्णालयांतील कालावधी निश्चितपणे कमी करत आहे. त्यादृष्टीने राज्याला रुग्ण संख्येनुसार पुरेसा पुरवठा व्हावा असेही मुख्यमंत्री म्हणाले.
रेमडेसिवीर व्यतिरिक्त इतर आवश्यक औषधांचा देखील तुटवडा भासू शकतो, हे लक्षात घेऊन केंद्राने तो पुरवठाही नियमित होत राहील, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
विषाणूच्या दुहेरी उत्परिवर्तनाचा अभ्यास आवश्यक
 
कोविड सुसंगत वर्तनावर कायमस्वरूपी भर देणार
आम्ही उद्योजक, कामगार तसेच इतरांशी सातत्याने बोलत असून तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी कोविड सुसंगत कार्यप्रणाली आत्मसात करणे खूप गरजेचे आहे. यात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा वाढविण्याबरोबर, कामाच्या वेळा आणि पद्धतीत फरक करणे आवश्यक असल्याचे आपण सांगितल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रधानमंत्र्यांना सांगितले.