शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: लखनौ , शनिवार, 11 फेब्रुवारी 2017 (12:01 IST)

मनमोहन सिंगने तर मोदींचे कौतुकच केले - राजनाथ सिंह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत बोलताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली होती. या टीकेवर पडदा टाकताना पंतप्रधान मोदींनी कोणाचाही अपमान केलेला नाही. याउलट ऐवढे घोटाळे होत असतानाही मनमोहन सिंग यांची स्वच्छ प्रतिमा कायम होती. मोदींनी यासाठीच मनमोहन सिंग यांचे कौतुक केले, असा निर्वाळा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी आज येथे दिला आहे. एका पत्रकार परिषदेत राजनाथ सिंह बोलत होते.
 
सरकारमध्ये इतके घोटाळे होत असताना पंतप्रधान असूनही मनमोहन सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचा एक डागही लागला नाही. बाथरुममध्ये रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला फक्त मनमोहन सिंग यांनाच माहिती आहे असे मोदींनी म्हटले होते. मोदींच्या या वादग्रस्त विधानावर काँग्रेससह सर्वच स्तरातून तीव्र पडसाद उमटले होते.
 
मोदींच्या या विधानावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. सिंह म्हणाले, आम्ही सर्व जण मनमोहन सिंग यांचा आदरच करतो. ऐवढे घोटाळे होऊनही मनमोहन सिंग यांच्यावर एकही आरोप झाला नाही, असे मोदींना म्हणायचे होते. मोदींनी मनमोहन सिंग यांचे कौतुकच केले आहे, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.
 
बहुजन समाज पक्ष पराभवाच्या मानसिकतेमधून निवडणूक लढवत आहे.तर उणे अधिक उणे केल्यास उत्तर शून्यच येते, असे सांगत त्यांनी काँग्रेस – समाजवादी पक्षाच्या आघाडीवर टीका केली. उत्तरप्रदेशमधील जाट समाज भाजपसोबत आहे. तामिळनाडूमध्ये शशिकला यांच्या शपथविधीवर राजनाथ सिंह म्हणाले की, राज्यपाल हा संवैधानिक दृष्ट्या राज्याचा प्रमुख असतो. आता तेच याप्रकरणात योग्य भूमिका घेतील, असे त्यांनी सांगितले.