शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 22 जून 2020 (09:17 IST)

सर्वांनी एकमेकांशी सहानुभूतीने वागा, रतन टाटा यांचे आवाहन

टाटा सन्सचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी ऑनलाईन द्वेष,धमकावणे, इतरांना दुय्यम ठरवणे यासारखे प्रकार रोखण्याचं आवाहन केलं आहे. या आव्हानात्मक वर्षात, प्रत्येकाने एकमेकांना पाठिंबा देण्याचं, मदत करण्याचं आवाहन रतन टाटा यांनी केलं आहे.
 
रतन टाटा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एका पोस्ट शेअर केली आहे. ऑनलाईन ग्रुप एकमेकांचं नुकसान करत असून एकमेकांना दुय्यम समजतं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे वर्ष कोणत्या ना कोणत्या रुपात सर्वांसाठीच आव्हानात्मक आहे. मी ऑनलाईन ग्रुप्स एकमेकांसाठी हानिकारक ठरत असल्याचं पाहतो आहे. लोक त्वरित मत तयार करुन समोरच्याला दुय्यम ठरवतं आहेत, असं ते म्हणाले.
 
'या वर्षात एकमेकांना दुय्यम न समजता आपल्याला सर्वांना एकत्रित राहून एकमेकांची मदत करायची आहे. एकमेकांना दुय्यम समजण्याची ही वेळ नाही. या काळात एकमेकांबद्दल अधिक संवेदनशीलता, अधिक प्रेमळपणा, दयाळूपणा, एकमेकांना अधिक समजून घेण्याची आणि धैर्याची गरज आहे. माझं ऑनलाइन अस्तित्व मर्यादित आहे, परंतु मला आशा आहे की हे सर्वांच्या सहानुभूती आणि पाठबळाच्या जोरावर विकसित होईल, एकमेकांचा द्वेष, गुंडगिरी करण्याऐवजी हे महत्त्वाचे ठरेल.', अशा आशयाची पोस्ट करत रतन टाटा यांनी सर्वांना एकमेकांशी सहानुभूतीने वागण्याचं भावनिक आवाहन केलं आहे.