गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (09:48 IST)

प्रेसमध्ये नोट छपाईचे आधुनिकीकरण करणार: गर्ग

नाशिक प्रेसने कामगारांच्या सहकार्यामुळे 13 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत तीनशे दशलक्ष नोटांचे उत्पादन केले. प्रेसमध्ये 10, 20, 50 या नोटांचेही काम वाढणार आहे. नाशिकरोड प्रेसमध्ये पाचशेच्या उत्पादन दुपटीने वाढविले जाणार असल्याची माहिती प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
 
कच्चा माल आणि आधुनिक मशिन्स दिल्या तर देशाच्या उत्पादनात भर पडेल, असे  परिषदेत मत केले आहे. प्रेस महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण गर्ग यांनी  देशातील असलेल्या सर्वात मोठ्या प्रेसला भेट देऊन प्रेस मजदूर संघाशी चर्चा केली आहे. त्याची माहिती देताना गोडसे म्हणाले की, नाशिकरोड प्रेसच्या मशिनरी जुन्या झाल्या असून आजपर्यंत ओव्हरहालिंग केलेले नाही. त्यामुळे मशिन्स मध्येच बंद पडतात. हे प्रमाण वाढले आहे. तसेच मशिनच्या आधुनिकीकरणाचे काम संथ गतीने सुरु आहे.
 
रिझर्व बॅंकेच्या दोन्ही प्रेसला चांगल्या प्रतिची शाई मिळते. शाई परदेशातूनही आयात करण्याची परवानगी त्यांना आहे. नाशिकरोड प्रेसला भारतीय शाई वापरावी लागते. करन्सी व सिक्युरिटी कागदपत्रे छापण्यात आघाडीवर असलेल्या ब्रिटीश डे-ला- रु कंपनीला महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद येथे जागा दिली आहे. या कंपनीला नोटा व अन्य सुरक्षा कागदपत्रे छापण्याची परवानगी न देता ती प्रेसला द्यावी. प्रेस कामगारांना टार्गेट अलाऊन्स मिळावा, सातवा वेतन आयोग त्वरित मिळावा, नवी कामगार भरती प्रेसमध्ये झालेली नाही ती त्वरित करावी आदी मागण्या प्रेस मजदूर संघाने गर्ग यांच्याकडे केल्या. 
 
प्रेस कामगारांनी दररोज जादा काम केले. दोन रविवारी सुटी घेतली नाही. त्याबद्दल प्रवीण गर्ग यांनी कामगारांना शाबासकी केली. प्रेस कामगारांना सुट्या नोटांची समस्या भेडसावत आहे. त्याची दखल घेत सरकारने परिपत्रक काढले आहे. त्यानुसार नाशिकरोड प्रेस कामगारांना दोन दिवसात रोख पगारापोटी दहा हजाराची रक्कम रोख मिळणार असल्याची माहिती गोडसे यांनी दिली. चेन्नईला ओझरहून विमानाने पाचशेच्या पाच दशलक्ष, शंभरच्या सहा दशलक्ष तर वीसच्या एक दशलक्ष नोटा पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात दोन हजार नोट छापण्याची मागणी आल्यास ती देखील पूर्ण करु असे ते म्हणाले आहेत.