1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

'स्वाईन फ्लू'ची लस: वर्षभरात ७७४ मृत्यू; सहा हजार रुग्णांना लागण

national news
राज्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असताना बहुतांश शासकीय रुग्णालयांत स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लसीचा पाच महिन्यांपासून तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे २०१७ या वर्षात ४ गर्भवती महिला तर ५ महिलांचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला आहे. तसेच राज्यभरात ७७३ व्यक्तींचा मृत्यू तर सहा हजार रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी लेखी उत्तरात दिली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. किरण पावसकर यांनी स्वाईन फ्लू लसींच्या तुटवड्याबाबत सरकारने चौकशी केली आहे का? तसेच या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणती उपाययोजना केली जात आहे, याबाबत विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
 
शासनाकडे उपलब्ध असलेल्या लसीच्या साठ्याची मुदत (एक्सपायरी डेट) ३१ मे २०१७ रोजी संपली. त्यानंतर नवी खरेदी प्रक्रिया होईपर्यंत जिल्हा व महानगरपालिकांना स्थानिक स्तरावर लस खरेदी करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे उत्तरात म्हटले आहे.
 
स्वाईन फ्लू लस उपलब्धतेबाबत आवश्यक ती पावले उचलल्यामुळे चौकशी होणार नाही, असेही सावंत यांनी स्पष्ट केले आहे. स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'महाराष्ट्र साथरोग प्रतिबंध व नियंत्रण तांत्रिक समिती' स्थापन केलेली असून सर्व खाजगी रुग्णालयांना स्वाईन फ्लू उपचाराची मान्यता देण्यात आली असल्याचे लेखी उत्तरात सांगितले आहे.