सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 12 ऑगस्ट 2019 (11:34 IST)

संपूर्ण देशभरात बकरी ईदचा उत्साह

देशभरात आज बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. मुस्लिम बांधवांनी दिल्ली, मुंबईच्या मशिदींमध्ये नमाज पठणासाठी गर्दी केली आहे. काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ईदचा उत्साह दिसून येत आहे. तर तिकडे पुराचा तडाखा बसलेल्या कोल्हापूर, सांगलीत साध्या पद्धतीने यंदाची ईद साजरी करण्यात येणार आहे. तसेच ईदवर होणारा खर्च टाळून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुस्लिम बांधव पुढे सरसावले आहेत.
 
आजच्या दिवशी बोकडाचा बळी देवून आणि मोठी दावत ठेवून हा कुर्बाणी सण साजरा करतात. यासाठी देशात आज उत्साहाचे वातावरण दिसत आहे. तर जम्मू-काश्‍मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच हा सण साजरा करण्यात येणार आहे त्यामुळे इथली सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. जागोजागी लष्कराचे जवान खडा पहारा देत आहेत जेणेकरून आजच्या सणाच्या दिवशी इथल्या नागरिकांना कोणताही त्रास होवू नये. तर तिकडे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुराची परिस्थिती पाहुन मुंबई, कोल्हापूर आणि सांगली भागातील मुस्लिम बांधवांनी यंदाची ईद अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करत यात होणारा अनावश्‍यक खर्च टाळून पुरग्रस्तांना मदत करण्याचे ठरवले आहे. तसेच साताऱ्यातील पुरग्रस्त गाव दत्तक घेण्याचाही इथल्या मुस्लिम बांधवांनी निर्णय घेता आहे.