शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 13 डिसेंबर 2021 (23:07 IST)

काश्मीरमध्ये पोलिसांच्या गाडीवर गोळीबार, 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर शहराच्या झेवन परिसरात पोलिसांच्या एका बसवर कट्टरतावाद्यांनी हल्ला केला आहे.
या हल्ल्यात 14 कर्मचारी जखमी झाले असून त्यातील 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
काश्मीर झोनच्या पोलिसांनी ट्विट करत या घटनेविषयी माहिती दिली की, "श्रीनगरच्या पांथा चौक परिसरात झेवन भागाजवळ कट्टरवाद्यांनी पोलिसांच्या गाडीवर गोळीबार केला आहे. यात 14 जण जखमी झाले आहेत. सगळ्यांना दवाखान्यात भरती करण्यात आलं आहे. या भागात नाकाबंदी करण्यात आली आहे."
जखमी पोलीस कर्मचाऱ्यांपैकी 1 एएसआय आणि सलेक्शन ग्रेड कॉन्सटेबल यांचा गंभीर दुखापतींमुळे मृत्यू झाला असल्याचं जम्मू-काश्मीर पोलिसांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी या हल्ल्याशी संबंधित माहिती मागवली आहे. त्यांनी हल्ल्यात मारल्या गेलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना जाहीर केल्या आहेत.
जम्मू-काश्मीरचे उप-राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यात प्राण गमावलेल्या पोलिसांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. या हल्ल्यात सहभागी असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत शिक्षा दिली जाईल, असं ते म्हणाले.
या हल्ल्यातील जखमींच्या चांगल्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
या हल्ल्यात प्राण गमावणाऱ्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. तसंच जखमींसाठी प्रार्थना करत असल्याचं उप-राज्यपाल म्हणाले.
राहुल गांधींनीही या हल्ल्यावर दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. तर जखमींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. या सुंदर खोऱ्यामध्ये शांतता नांदावी आणि दहशतीचा अंत व्हावा अशी संपूर्ण देशाची इच्छा आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.
"हा हल्ला दुर्दैवी आहे. हल्ल्यात प्राण गमावलेल्यांप्रती माझ्या शोक संवेदना आहेत. माझी सरकारला विनंती आहे की, या गोष्टी संपवायच्या असतील तर त्यांनी लोकांची मन जिंकायला हवीत. मनं जिंकली तर अशा गोष्टी घडणार नाहीत," असं नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला म्हणाले.